‘‘वेटलिफ्टिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची लयलूट करण्यासाठी आवश्यक असणारी गुणवत्ता भारतीय खेळाडूंमध्ये आहे, मात्र खेळाचा दांडगा अनुभव पाठीशी असलेल्या प्रशिक्षकांच्या अभावामुळेच व लायकी नसलेल्या प्रशिक्षकांच्या हातात प्रशिक्षकाची सूत्रे असल्यामुळे भारतास आशियाई व ऑलिम्पिक स्पर्धामध्ये अपेक्षेइतके यश मिळविता आलेले नाही,’’ असे ऑलिम्पिकमधील वेटलिफ्टिंग या क्रीडाप्रकारात एकमेव पदक मिळविणाऱ्या करनाम मल्लेश्वरी हिने सांगितले.
मल्लेश्वरीने २०००मध्ये  सिडनी येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविले होते, तसेच तिने १९९८ मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. भारताच्या वेटलिफ्टिंगविषयी तिने ‘लोकसत्ता’ला दिलेली खास मुलाखत.
भारतीय वेटलिफ्टिंग क्षेत्राविषयी काय सांगता येईल ?
या खेळात आपल्या देशात सकारात्मक वातावरण दिसत असले तरीही मी त्याबाबत समाधानी नाही. पात्रता नसलेल्या लोकांकडे खेळाची व प्रशिक्षकपदाची सूत्रे दिल्यानंतर त्यांच्याकडून खूप काही नेत्रदीपक बदल घडतील अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. खेळापेक्षा भांडणे व उत्तेजक औषधे सेवन प्रकरणामुळेच भारतीय वेटलिफ्टिंग क्षेत्र सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिले आहे.
*  राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीबाबत तुझे काय मत आहे?
वेटलिफ्टिंगबाबत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही लुटुपुटुची लढाई असते. त्यामध्ये भारताने चांगले यश मिळविले म्हणजे खूप मोठी कामगिरी केली असे मी म्हणणार नाही. या स्पर्धाच्या तुलनेत आशियाई स्पर्धेचा दर्जा खूपच वरचा असतो. ऑलिम्पिकमध्ये वर्चस्व गाजविणारे चीन, इराण, दक्षिण कोरिया, जपान यांच्याबरोबरच थायलंडच्या खेळाडूंनीही या खेळात खूप प्रगती केली आहे.
*  प्रशिक्षकांच्या कामगिरीबाबत तुला समाधान वाटते काय ?
मुळीच नाही. राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रशिक्षकांपैकी बहुतेक प्रशिक्षकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धाचा अनुभव नाही. त्यामुळे आपले खेळाडू अपेक्षेइतकी कामगिरी करू शकत नाहीत. भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची लयलूट करण्यासाठी परदेशी प्रशिक्षकांचीच नितांत आवश्यकता आहे. परदेशी प्रशिक्षकांना आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा भरपूर अनुभव असतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धासाठी कशी तयारी करावी लागते याचे ज्ञान त्यांच्याकडे असते. ज्येष्ठ खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार करून त्यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविली पाहिजे. तसेच प्रशिक्षकांच्या कामात संघटनेमधील पदाधिकाऱ्यांनी ढवळाढवळ करू नये, असे माझे स्पष्ट मत आहे.
*  आपल्या देशात उत्तेजक औषध सेवनाबाबत जाणीव झाली आहे काय ?
भारतामध्ये गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये उत्तेजक औषधे प्रतिबंधक समितीने खूप चांगले कार्य केले आहे. त्यांनी खेळाडूंची आकस्मिक वैद्यकीय चाचणी, सराव शिबिराच्या ठिकाणाजवळील औषधांच्या दुकानांत तपासणी करणे अशा अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच मोठय़ा प्रमाणात उत्तेजक औषधे सेवनावर नियंत्रण मिळविण्यात भारतीय संघटक यशस्वी ठरले आहेत.  
ल्ल  ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविल्यानंतर तुझी काय भावना होती?
ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्यामुळे मला खूप आनंद झाला. त्या वेळी अन्य खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी अतिशय निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे मी मिळविलेल्या कांस्यपदकाचे खूप कौतुक झाले. कांस्यपदक मिळविल्याच्या आनंदापेक्षाही सुवर्णपदक मिळविता आले नाही याचीच खंत मला जास्त होती. मी हे यश निश्चित मिळविले असते. थोडेसे जास्त प्रयत्न केले असते तर सोनेरी यशही मी मिळवू शकले असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा