दुबई : आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदाचे स्वप्न साकारायचे असल्यास, आम्ही येथील वातावरण आणि खेळपट्ट्यांशी जुळवून घेणे, तसेच सकारात्मक मानसिकता राखणे आवश्यक आहे, असे भारतीय महिला संघाची अनुभवी फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज म्हणाली.

२०२० मध्ये झालेल्या महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपविजेता ठरला होता. २०२२ मध्ये झालेल्या गेल्या स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले होते. आता संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात ‘आयसीसी’ जेतेपदाची प्रतीक्षा संपवण्याचे ध्येय भारतीय महिला संघाने बाळगले आहे. भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात शुक्रवारी (४ ऑक्टोबर) न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याने करणार आहे.

हेही वाचा >>> IND vs BAN Test Series : भारताच्या बांगलादेशवरील मालिका विजयाची ५ कारणे कोणती आहेत? जाणून घ्या

‘‘परिस्थितीचे मूल्यांकन करणे आणि त्यानुसार खेळ करणे हेच माझे नियोजन असेल. संघाच्या विजयासाठी आणि संघाला माझ्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करेन. असा दृष्टिकोन ठेवून जेव्हा मी खेळते, तेव्हा माझ्याकडून सर्वोत्तम खेळ होतो. भारतीय संघासाठी मी कायमच सर्वस्व पणाला लावते. अशा वेळी माझा खेळ अधिक उत्कट आणि उत्साहाने भरलेला असतो. भारताने या स्पर्धेत विजेतेपद मिळवावे हीच माझी इच्छा आहे,’’ असे जेमिमाने एका मुलाखतीत सांगितले.

भारतीय महिला संघाने २००५ आणि २०१७ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही अंतिम फेरी गाठली होती. मात्र, भारतीय संघ विजेतेपदापासून दूरच राहिला. या वेळी विश्वविजेतेपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक खेळाडू प्रेरित असल्याचे जेमिमा म्हणाली.

न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया अशा संघांचा बारीक अभ्यास आम्ही केला आहे. प्रत्येक संघासाठी आमचे नियोजन तयार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याची तीव्रता अलीकडे खूपच वाढली आहे. त्यामुळे जिंकायचे असेल, तर सर्वोत्तम खेळाशिवाय पर्यायच नाही. – जेमिमा रॉड्रिग्ज.