भारतीय खेळाडूंनी सध्या चीनमध्ये चाललेल्या एशियन गेम्समध्ये देशाची मान उंचावली आहे. आशियाई स्पर्धेत आत्तापर्यंत ७० पदकांची भारताची सर्वोत्तम कामगिरी होती. मात्र, यंदा पहिल्यांदाच भारताची पदकसंख्या ७०च्या वर गेली आहे. बुधवारी नीरज चोप्रानं भालाफेक प्रकारात देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं. त्यापाठोपाठ किशोर जेना यानंही दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी करत देशाला रौप्यपदक मिळवून दिलं. त्यामुळे भारताच्या पोतडीत आणखी दोन पदकांचा समावेश झाला आहे. मात्र, या सामन्यानंतर घडलेला एक प्रसंग सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

बुधवारी नीरज चोप्रा व किशोर जेनाच्या पदकांमुळे भारताची पदकसंख्या आता ७८वर पोहोचली आहे. पहिल्या दोन स्थानांसाठी नीरज चोप्रा व जेना किशोर यांच्यातच तगडी लढत झाली. आधी नीरज चोप्रा मागे पडला होता. पण चौथ्या प्रयत्नात नीरज चोप्रानं ८८.८८ मीटरचा टप्पा गाठला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. त्यापाठोपाठ जेना किशोर दुसऱ्या स्थानी राहिला. त्यामुळे भालाफेक प्रकारातील पहिली दोन्ही पदकं भारताच्या नावावर झाली!

नेमकं काय घडलं?

नीरज चोप्राच्या सुवर्णवेधानंतर घडलेला एक प्रसंग सध्या चर्चेत आला आहे. एकीकडे नीरज चोप्राच्या पहिल्या प्रयत्नावेळी आयोजकांना त्याच्या भालाफेकीचा टप्पाच न सापडल्यामुळे त्याला पुन्हा एकदा भालाफेक करावी लागली. हे प्रकरण चर्चेत असताना दुसरीकडे नीरज चोप्राच्या देशभक्तीचा दाखला देणारा एक प्रसंग समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Asian Games: भारताने भालाफेकमध्ये रचला इतिहास! नीरज चोप्राने सुवर्ण, तर किशोर जेनाने रौप्यपदकावर कोरले नाव

सामन्यानंतर नीरज चोप्रा व जेना किशोर फोटोग्राफर्सला पोज देत होते. यावेळी प्रेक्षकांमधून कुणीतरी नीरज चोप्राशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नीरज प्रेक्षकांच्या खुर्च्यांच्या दिशेने आला व काहीतरी बोलून पुन्हा फोटोंसाठी जायला वळला. तेव्हा प्रेक्षकांमधून त्याला पुन्हा कुणीतरी आवाज दिला व फोटो काढण्यासाठी राष्ट्रध्वज त्याच्या दिशेनं फेकला.

वास्तविक नीरज ध्वज घेण्यासाठी त्या प्रेक्षकापर्यंत पोहोचण्याआधीच त्यानं ध्वज नीरजच्या दिशेनं फेकला. हवेच्या झोतामुळे ध्वज नीरजच्या हातात न येता जमिनीवर पडण्याच्या बेतात होता. पण तेवढ्यात नीरज चोप्रानं जवळपास ध्वजाच्या दिशेनं झेपावत तिरंगा हातात घेतला आणि त्याचा अवमान होण्यापासून वाचवलं. नीरजच्या या कृतीचं सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

पहिल्या प्रयत्नाची चर्चा!

दरम्यान, भालाफेकीच्या नीरजच्या पहिल्या प्रयत्नाची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. नीरज चोप्रानं भाला फेकल्यानंतर त्याचा टप्पाच मोजण्यात आयोजकांनी गडबड केली. तो टप्पा आयोजकांना न सापडल्यानं त्यांनी नीरजला पुन्हा एकदा भालाफेक करण्याची संधी दिली.

Story img Loader