Neeraj Chopra Angry At Asian Games Management: नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भालाफेकीत ८८.८८ मीटरच्या थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. पण या स्पर्धेच्या वेळी चीनकडून झालेल्या बेजबाबदार वागणुकीमुळे नीरज चोप्राचा विजय सुद्धा वादग्रस्त ठरला आहे. स्पर्धेत विद्यमान विश्वविजेता नीरज चोप्राचा पहिलाच थ्रो जबरदस्त होता. बघताना साधारण अंदाजाने या थ्रोने ८५ मीटरचा टप्पा सहज पार केला असावा असे वाटते. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे आयोजकांना थ्रो मोजताच आला नाही आणि नीरजला पुन्हा एकदा थ्रो करावा लागला. यामुळे सर्वच गोंधळून गेले असताना, नीरजने ‘दुसऱ्या’ वेळीस केलेल्या पहिल्या प्रयत्नात ८२.३८ मीटर थ्रो केला व अखेरीस चौथा थ्रो (८८.८८ मी) फेकून त्याने सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेनंतर या घडलेल्या प्रकारावर नीरज चोप्राने सुद्धा संताप व्यक्त केला.
नीरज म्हणाला, “मी गोंधळून गेलो होतो. मी आतापर्यंत जितक्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे त्यात हे कधीच घडले नाही. त्यांना लँडिंग मार्क सुद्धा शोधता आला नाही. माझ्याकडे अन्य काही पर्याय नव्हता, वाद घालण्यातही अर्थ नव्हता कारण यामुळे स्पर्धेवर इतर स्पर्धकांवर सुद्धा परिणाम होणार होता, माझ्यामुळे इतर स्पर्धकांना वाट पाहावी लागत होती आणि त्यांचा मान ठेवण्यासाठी म्हणून मी शांत झालो. तेव्हा खूप वारा होता आणि थंडी वाजत होती त्यामुळे मग मी पुन्हा नंतर थ्रो करायचं ठरवलं. स्पर्धेच्या नियमानुसार खेळाडूला सहाच वेळा थ्रो करता येतो पण मी या स्पर्धेत तब्बल सात वेळा थ्रो केला”
नीरज पुढे म्हणाला की, “एवढ्या मोठ्या स्पर्धेतील माझा पहिला थ्रो वाया गेला याचे मला वाईट वाटले. ज्योतीबाबतही असेच घडले, माझ्यासोबतही असेच घडले. थ्रोच्या वेळी जेनाला देखील याचा सामना करावा लागला. तरीही आमच्या संघाने निश्चितपणे हे पाहिले पाहिजे की आम्हाला इतक्या समस्या का भेडसावत आहेत, मी मोठ्या स्पर्धांमध्ये असे प्रकार कधीच पाहिलेले नाहीत. मी किंवा इतर खेळाडू पहिल्या थ्रोनंतर निराश झाले असते. काहीही होऊ शकते. पण शेवटी, मी म्हणेन की अंतिम निकाल आमच्यासाठी चांगला होता. जे काही झाले त्यामध्ये आम्ही सिद्ध केलंय की आम्ही सगळ्या परिस्थितींसाठी तयार आहोत.”
Video: नीरज चोप्राचा गोल्डन थ्रो
हे ही वाचा<< बाबर आझमला रवी शास्त्रींनीं बिर्याणीवरून चिडवलं; सडेतोड उत्तराने नेटकरी लोटपोट, म्हणाला, “१०० वेळा ते..”
दरम्यान, २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. ज्योती याराजीला सुरुवातीला ११० मीटर हर्डल शर्यतीच्या अंतिम फेरीत अपात्र ठरवण्यात आले होते परंतु नंतर चूक ज्योतीची नसून चीनच्या खेळाडूची असल्याचे लक्षात आल्याने तिला कांस्य ऐवजी रौप्यपदक देण्यात आले होते.