भारताच्या २३ वर्षीय नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आणि इतिहास रचला! भारतासाठी हा मोठा सुवर्णक्षण ठरला. दरम्यान, याच अभूतपूर्व कामगिरीच्यानिमित्ताने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचे वडील सतीश कुमार आपल्या मुलाच्या यशाने भारावून गेल्याचे पाहायला मिळाले. आपल्या मुलाच्या विजयाबद्दल बोलताना सतीश कुमार म्हणाले कि, “मला माझा आनंद शब्दात व्यक्त करता येणं कठीण आहे. मी अत्यंत आनंदी आहे कारण माझ्या मुलाच्या प्रयत्नांमुळे, यशामुळे आपल्या देशाचं स्वप्न पूर्ण झालं आहे.” सतीश कुमार यावेळी एएनआयशी बोलत होते.
एका शेतकऱ्याला कधीच भरभरून जगायला मिळत नाही, पण…!
“आम्ही एका शेतकरी कुटुंबातून येतो. एका शेतकऱ्याला स्वतःच्या इच्छेनुसार कधीच भरभरून जगायला मिळत नाही. परंतु, माझा असा विश्वास आहे की ज्या कुटुंबांना मूलभूत सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागला, त्या कुटुंबांना त्याचं नेमकं महत्त्व समजलं आहे. त्यांच्यात आपलं स्वप्नं जगण्याचं आणि काहीतरी साध्य करण्याचं धैर्य आहे”, अशा शब्दांत सतीश कुमार यांनी विश्वास व्यक्त केला. ह्या सगळ्यात शारीरिक आणि मानसिक आरोग्याचं असलेलं महत्त्वही सांगताना यावेळी ते म्हणाले कि, “जोपर्यंत आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेत नाही तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकणार नाही. नीरजनेही तेच केले.”
आम्हाला विश्वास होताच, त्याने सिद्ध करून दाखवलं!
नीरज चोप्राने देशाला दिलेल्या या सुवर्णक्षणांमुळे अत्यंत भारावलेले सतीश कुमार पुढे म्हणाले कि, “आमचं चार भावांचं कुटुंब आहे. आमच्या कुटुंबातील प्रत्येकानेच नीरजला सर्वोत्तम भालाफेकपटू बनण्यासाठी योग्य मार्गदर्शन कसं मिळेल याची खात्री केली होती. त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वांनी त्याला साथ दिली. इतकंच काय तर आमच्या संपूर्ण गावाने त्याच्या यशासाठी प्रार्थना केली होती. आम्हाला सुरुवातीपासूनच विश्वास होता कि, आमच्या मुलामध्ये सुवर्ण पदक जिंकण्याची क्षमता आहे. पण आता त्याने ते सिद्ध करून दाखवलं आहे”, हे बोलताना सतीश कुमार यांना आपले अश्रू अनावर झाले.
Father of Olympic medalist Neeraj Chopra expresses happiness on son's Gold medal, says country's dream fulfilled
Read @ANI Story | https://t.co/Kdq2qkaXds#NeerajChopra #Tokyo2020 pic.twitter.com/ijLdk3xqwK
— ANI Digital (@ani_digital) August 7, 2021
नीरजने भारताची तब्बल १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली
भालाफेकपटू नीरज चोप्रा हा शोपीस इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा देशातील पहिला ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट ठरला आहे. ब्रिटिश भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती. परंतु तो इंग्रज होता, भारतीय नव्हता. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरी पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.
नीरजच्या या अद्भुत कामगिरीसह भारताने मल्टी-स्पोर्टींग इव्हेन्टमध्येही ७ पदके जिंकली आहेत. पाहूया सर्वोत्तम कामगिरी केलेले देशाचे क्रीडापटू. सध्या सुरु टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये बजरंग पुनिया (कांस्य), मीराबाई चानू (रौप्य), पीव्ही सिंधू (कांस्य), लवलिना बोर्गोहेन (कांस्य), पुरुष हॉकी संघ (कांस्य) आणि रवी कुमार दहिया (रौप्य) यांनी ही पदके जिंकली आहेत.