टोक्यो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेतील भालाफेक प्रकारात भारताच्या नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावलं. या विजयानंतर संपूर्ण भारतात जल्लोष करण्यात आला. असाच आनंद जर्मनीतील एका गावात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. मात्र जर्मनीत जल्लोष का?, असा प्रश्न सर्व क्रीडाप्रेमींना पडला आहे. याला कारण आहे, डॉक्टर क्लॉस बारतोनित्ज यांचं योगदान. नीरजला प्रशिक्षण आणि त्याच्यात सुधारणा करण्यात डॉक्टर क्लॉस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे क्लॉस यांच्या जर्मनीतील ओबर्सशेलटेनबाक गावात जल्लोष करण्यात आला. क्लॉस गेल्या काही वर्षांपासून नीरजच्या सोबत असून त्याला सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्यामुळे नीरजला सुवर्ण पदक पटकवण्यासाठी मदत झाली. नीरज भारताचा नवा आयकॉन बनला, तर क्लॉस त्यांच्या गावकऱ्यासाठी हिरो ठरले आहेत.
“दिल्लीत नीरज चोप्राला सुरक्षेच्या घेरावात पाहून मला आश्चर्य वाटलं. त्याच्या संरक्षणासाठी सुरक्षारक्षकांना तैनात करण्यात आलं होतं. इतकं प्रेम नीरजला मिळताना पाहून मलाही आनंद झाला. तसेच मी माझ्या गावी हिरो झालो आहे. मलाही नीरजच्या विजयानंतर शुभेच्छा मिळत आहेत. आमच्या गावात नीरजच्या भालाफेकीची चर्चा आहे.”, असं डॉक्टर क्लॉस यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं.”माझ्या गावात खूप साधे लोक आहेत. कुणीही खेळासोबत जोडलेलं नाही. असं असूनही नीरजच्या कामगिरीने प्रभावित आहेत. मला काही खेळाडू आणि अॅथलीट्स यांचा फोन आला, तेव्हा त्यांनी, फिल्मस्टार सारख्या दिसणाऱ्या खेळाडूनं ही कामगिरी कशी केली? असा प्रश्न विचारला” असं डॉक्टर क्लॉस यांनी सांगितलं. दुसरीकडे त्यांनी जर्मनीतल्या सुवर्णपदक विजेत्याला जवळपास १७ लाख रुपये मिळाले. मात्र नीरजवर भारत सरकार आणि इतरांनी बक्षिसांचा वर्षाव केला आहे. हे आनंद खूप महत्वाचा आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
T20 वर्ल्डकप: १० सप्टेंबरपर्यंत खेळाडूंची यादी पाठवा; आयसीसीची सूचना
भारतानं अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकत १२१ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. भारताला अॅथलेटिक्स प्रकारात पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळालं आहे. नीरजने अंतिम फेरीत ८७.५८ मीटर लांब भाला फेकत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं. तर दुसरीकडे भारताला १३ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे.
सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा पडला आजारी; करोना चाचणी आली निगेटिव्ह
सुवर्णपदक जिंकल्यामुळे नीरज चोप्राच्या गुणसंख्येत वाढ झाली असून जागतिक क्रमवारीत त्याने झेप घेतली आहे. जागतिक क्रमवारीत नीरज चोप्रा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. नीरजची गुणसंख्या १३१५ असून जर्मनीचा जोहान्स १३९६ गुणांसहित पहिल्या क्रमांकावर आहे.