पीटीआय, बुडापेस्ट (हंगेरी) : जागतिक अॅथलेटिक्स संघटनेच्या उपाध्यक्षपदी आदिल सुमारीवालांच्या नियुक्तीने जागतिक स्पर्धेत मैदानाबाहेर भारताची सकारात्मक सुरुवात झाली असली, तरी आज, शनिवारपासून प्रत्यक्षात ट्रॅकवर सुरू होणाऱ्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कौशल्याची खरी कसोटी लागेल. या स्पर्धेत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राच्या कामगिरीवर सर्वाच्या नजरा असतील.
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णफेक करणाऱ्या नीरजला आतापर्यंत जागतिक स्पर्धेतील सुवर्णयशाने मात्र कायम हुलकावणी दिली आहे. अखेरच्या अमेरिकेतील स्पर्धेत नीरजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. नव्या हंगामात यापूर्वीच सुवर्णयश संपादन केलेला नीरज या वेळी निश्चितपणे सुवर्णपदकाच्या शर्यतीत असेल. नीरजने येथे सुवर्णपदक मिळवल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलिम्पिक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा क्रीडापटू ठरेल. यापूर्वी अशी कामगिरी केवळ नेमबाज अभिनव बिंद्राला करता आली आहे. बिंद्राने १० मीटर एअर रायफल प्रकारात २००६च्या जागतिक स्पर्धेत आणि त्यानंतर २००८च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.
नीरजने या हंगामात डायमंड लीगमध्ये सुवर्णयश मिळवले असले, तरी तो केवळ दोनच स्पर्धात सहभागी झाला आहे. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता जागतिक स्पर्धेत उतरताना नीरजने आपण शंभर टक्के तंदुरुस्त असून, आव्हान स्वीकारण्यास सज्ज असल्याचे सांगितले. चेक प्रजासत्ताकचा याकूब वाडलेज, जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि गतविजेता अँडरसन पीटर्स या नेहमीच्याच खेळाडूंचे आव्हान नीरजसमोर असेल. सध्या या खेळाडूंमध्ये वाडलेज (८९.५१ मीटर) आणि वेबरची (८८.७२ मीटर) फेक सर्वोत्तम असून, नीरजने या वर्षी लोझान येथे ८८.६७ मीटर भाला फेकला होता.
साबळेकडून आशा
नीरजपाठोपाठ भारताला उडी प्रकारातून यश मिळण्याच्या आशा आहेत. यामध्ये जस्विन अल्ड्रिन (८.४२ मीटर) आणि मुरली श्रीशंकर (८.४१ मीटर) यांनी लांब उडीत आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडली आहे. पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात अविनाश साबळेही सनसनाटी कामगिरी करू शकतो. अविनाशची पात्रता फेरी शनिवारी होणार आहे. आकाशदीप सिंग, विकास सिंह, परमजित सिंह हे तिघे चालण्याच्या शर्यतीत उतरणार आहेत. शनिवारीच ही शर्यत होणार आहे.
पहिल्या दिवशी हे भारतीय मैदानात
९ शैली सिंह (महिला लांब उडी)
९ अजय कुमार सरोज (१५०० मीटर धावणे, पात्रता)
९ प्रवीण चित्रवेल, अब्दुल्ला अबुबकर, एल्डहोस पॉल (पुरुष तिहेरी उडी, पात्रता फेरी)
९ अविनाश साबळे (३ हजार मीटर स्टीपलचेस, पात्रता)
९ आकाशदीप सिंग, विकास सिंह, परमजित सिंह
(२० किलो मीटर चालणे)
जागतिक स्पर्धा नेहमीच आव्हानात्मक असते. मी शंभर टक्के देण्यात यशस्वी झालो, तर यापूर्वीपेक्षा माझी कामगिरी सरस होईल. मला ९० मीटरचे अंतरही लवकरच गाठण्याचा विश्वास आहे.- नीरज चोप्रा