Neeraj Chopra Narendra Modi Congratulations for silver medal : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ८९.४५ मीटर दूर भाला फेकून रौप्यपदकाला गवसणी घातली आहे. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजमुळे भारताच्या झोळीत पाचवं पदक पडलं आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरजने सुवर्णपदक पटकावलं होतं. मात्र यंदा तो त्याचं सुवर्णपदक राखू शकला नाही. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने तब्बल ९२.९७ मीटर दूर भाला भेकून सुवर्णपदक पटकावलं आहे. नीरज सुवर्णपदक जिंकू शकला नसला तरी त्याच्या रौप्य पदकाने भारतीय नागरिक सुखावले आहेत. देशभरातून नीरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नीरजची पाठ थोपटली आहे. मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत नीरजला शाबासकी दिली आहे.
मोदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की “नीरज चोप्रा हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे. त्याने वेळोवेळी त्याची प्रतिभा दाखवली आहे. त्याने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक पदकाला गवसणी घातल्यामुळे भारतीय नागरिक सुखावले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल नीरजचं अभिनंदन. देशात तयार होणाऱ्या नव्या खेळाडूंसाठी तो प्रेरणास्त्रोत आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी, देशाला गौरवान्वित करण्यासाठी तो इतर खेळाडूंना प्रेरित करत राहील.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा २०२४ मध्ये रौप्य पदक पटकावल्यानंतर नीरज चोप्राने एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी त्याने सुवर्णपदक हुकल्याचं दुःख असल्याची भावना व्यक्त केली. तसेच येत्या काळात तो त्याच्या खेळात नक्कीच सुधारणा करेल असंही म्हणाला.
नीरज काय म्हणाला?
“आपण देशासाठी पदक जिंकतो, तेव्हा आनंद होतो. यंदा रौप्य पदक जिंकलो, त्याचा आनंद आहेच. मात्र, सुवर्ण पदक हुकल्याचं दुःखही मनात आहे. परंतु, आता स्वत:मध्ये सुधारणा करण्याची वेळ आहे. याबाबत टीमबरोबर चर्चा करेन.” नीरजने यावेळी सर्वांना विनंती केली की कोणीही टोक्यो ऑलिम्पिकमधील खेळाडूंच्या कामगिरीची व आताच्या स्पर्धेतील कामगिरीची तुलना करू नये. नीरज म्हणाला, “यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सर्वच भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. कोणीही टोक्यो ऑलिम्पिकमधील पदकांची तुलना या ऑलिम्पिमकमधील पदकांशी करू नये, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक खेळाडूने त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. प्रत्येक वेळी पदकांची संख्या वाढेलच असं नसतं. पण येत्या काळात नक्कीच पदकांच्या संख्येत वाढ होईल, असा मला विश्वास आहे.”
हे ही वाचा >> Neeraj Chopra Mother: सुवर्णपदक हुकल्यानंतर नीरज चोप्राच्या आईचं पाकिस्तानच्या अर्शद नदीमबद्दल मोठं विधान; म्हणाल्या…
ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यातील खेळाडूंची कामगिरी
भारतीय वेळेनुसार गुरुवारी रात्री ११.४५ वाजता झालेल्या सामन्यात नीरज चोप्राने अंतिम फेरीत ८९.४५ थ्रो करत रौप्य पदक पटकावलं. यंदाच्या मोसमातील ८९.४५ हा त्याचा सर्वोत्तम थ्रो ठरला. या रौप्यपदकासह त्याने त्याचं दुसरं ऑलिम्पिक पदक जिंकलं आहे. तसेच मैदानी खेळात सलग दुसरं ऑलिम्पिक पदक पटकावणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात सर्वाधिक ८९.४५ मीटर दूर भाला फेकला. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटरच्या थ्रोसह ऑलिम्पिक विक्रम केला. या सामन्यात ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स ८८.५४ मीटर थ्रोसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.