नवी दिल्ली : भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्रा या महिन्यात होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. लीगच्या हंगामातील १४ स्पर्धांनंतर नीरज चौथ्या स्थानाने अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. नीरजने दोहा आणि लुसाने येथे झालेल्या एकदिवसीय स्पर्धेतून दुसरे स्थान मिळवत १४ गुणांची कमाई केली. ब्रुसेल्स येथे झालेल्या अखेरच्या टप्प्यात नीरज सहभागी झाला नव्हता. अंतिम फेरी ब्रुसेल्स येथेच १३ आणि १४ सप्टेंबरला होणार आहे.भारताचा नीरज चेक प्रजासत्ताकच्या जेकब वाल्डेचपेक्षा दोन गुणांनी मागे आहे. ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर अनुक्रमे २९ आणि २१ गुणांसह पहिल्या दोन क्रमांकावर आहेत.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा नीरज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. यंदाच्या हंगामात दुखापतीमुळे नीरजच्या कामगिरीवर परिणाम झाला. यंदा ९० मीटरचा टप्पा ओलांडण्याचे उद्दिष्ट बाळगलेल्या नीरजला अपयश आले. ही अंतिम फेरी नीरजसाठी हंगामाची खऱ्या अर्थाने अखेरची ठरणार आहे. त्यानंतर वैद्याकीय सल्ला घेऊन तो शंभर टक्के तंदुरुस्त राहण्यावर भर देणार आहे.