लोझान : भारताचा ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राच्या पुनरागमनाची प्रतीक्षा संपली असून, शुक्रवारी डायमंड लीगमधूनच तो स्पर्धात्मक स्तरावर पुन्हा खेळणार आहे. डायमंड लीगचा हा टप्पा स्वित्र्झलडमधील लोझान येथे होईल.

याच वर्षी ५ मे रोजी डायमंड लीगच्या पहिल्याच स्पर्धेत नीरजचे सुवर्णपदक मिळवून हंगामाची यशस्वी सुरुवात केली होती. आता डायमंड लीगमधूनच नीरज पुनरागमन करणार आहे. पहिल्याच स्पर्धेत नीरजने ८८.६७ मीटर भालाफेक केली होती. मात्र, त्यानंतर दुखापतीमुळे नीरज जवळपास एक महिना विविध स्पर्धापासून दूर राहिला.

पुनरागमनाच्या स्पर्धेत नीरजसमोर जेकब वाडलेच, जगज्जेता अँडरसन पीटर्स, ऑलिव्हर हेलॅण्डर, केशॉर्न वॉलकॉट आणि ज्युलियन वेबर यांचे आव्हान असेल. यातील वाडलेच आणि अँडरसन यांनी ९० मीटरहून अधिक भालाफेक केली आहे.