Neeraj Chopra on Vinesh Phogat weigh-in controversy : भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटसाठी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा ही एखाद्या वाईट स्वप्नासारखी ठरली आहे. विनेशने महिलांच्या कुस्ती स्पर्धेत (५० किलो वजनी गट) अंतिम फेरीत धडक दिली होती. अशी कामगिरी करणारी ती भारताची आजवरची पहिलीच महिला कुस्तीपटू ठरली होती. मात्र अंतिम सामन्याच्या काही तास आधी तिला मोठा धक्का बसला. सामन्याच्या काही वेळ आधी तिचं वजन तपासण्यात आलं. मात्र तिचं वजन ५० किलो १०० ग्रॅम भरलं. त्यामुळे तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं. त्यामुळे विनेशचं ऑलिम्पिक पदक विजयाचं स्वप्न भंगलं आहे. अतिम सामन्यात धडक दिल्यामुळे विनेशने भारतासाठी सुवर्ण किंवा रौप्य पदक निश्चित केलंय असं वाटत असतानाच विनेशसह संपूर्ण भारताला मोठा धक्का बसला.
स्पर्धेच्या आयोजकांविरोधात विनेशने आता आंतराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे. विनेशने रौप्य पदकाची मागणी केली आहे. मात्र अपात्रतेच्या कारवाईमुळे ती मनाने कोलमडून गेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरपासून इतर खेळाडू व सेलिब्रेटी विनेशला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यानेही विनेशला धीर दिला आहे. नीरज चोप्रा म्हणाला, “विनेशसाठी ईश्वराने काहीतरी वेगळी आणि चांगली योजना आखली असेल.”
मी खूप दुखावलो आहे : नीरज चोप्रा
नीरज चोप्राने विनेशचं कौतुक केलं व तो म्हणाला, “तिने पॅरिसमध्ये जे काही करून दाखवलंय ते एक उत्तम उदाहरण आहे. युई सुसाकीला पराभूत करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तिने कुस्तीच्या मैदानात जे काही केलंय त्यासाठी तिला सलाम करायला हवा. मला कुस्तीतलं फार काही समजत नाही, मात्र मला माहिती आहे की ती सुवर्णपदकाच्या दिशेने मार्गक्रमण करत होती. मात्र मध्येच ही अपात्रतेची कारवाई झाली. यामुळे मी खरोखर खूप दुखावलो आहे.”
हे ही वााचा >> Vinesh Phogat: विनेश फोगटला पदक मिळणार की नाही? याचिकेसंदर्भात आली नवी अपडेट…
तिचं कुस्तीच्या मैदानात परत येणं (आंदोलनानंतर), पुन्हा उभं राहणं, स्वतःला इथपर्यंत (ऑलिम्पिकची अंतिम फेरी) आणणं, हा प्रवास चालू असताना मजबूत होणं, सर्व काही चांगलं चाललं होतं. पण अचानक काय झालं माहिती नाही. ईश्वराने तिच्यासाठी काहीतरी वेगळं योजलं असणार. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की तिने जे काही केलंय ते सर्वोत्कृष्ट होतं.
नीरजच्या वडिलांना रौप्य पदकाची आशा
दरम्यान, नीरज चोप्राच्या वडिलांनी आशा व्यक्त केली आहे की विनेशने क्रीडा लवादाकडे याचिका दाखल केली असून तिच्या बाजूने निकाल येईल. तसेच तिला रौप्य पदकाने सन्मानित केलं जाईल.