Neeraj Chopra Statement on Vinesh Phogat: भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राची देशाची कुस्तीपटू विनेश फोगटने टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती आणि ४ वेळा विश्वविजेती जपानची युई सुसाकी हिचा पराभव केल्याचे ऐकताच चकित झाला. २९ वर्षीय फोगटने युई सुसाकीचा पराभव करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. महिलांच्या ५० किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत राऊंड ऑफ १६च्या फेरीत युईला ३-२ ने पराभूत केले. त्यानंतर फोगटने उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओक्साना लिवाचविरुद्धचा उपांत्यपूर्व सामना जिंकून आपले उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.
दुसरीकडे, नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीसाठी त्याच्या पहिल्या प्रयत्नातच पात्र ठरला, जो त्याचा हंगामातील ८९.३४ मीटरसह सर्वोत्कृष्ट थ्रो ठरला. भालाफेक स्पर्धेतील पात्रता फेरीतून अंतिम फेरीत जाण्यासाठी ८४ मीचरच्या पुढे थ्रो करायचा होता. पण नीरजने पहिल्याच थ्रोमध्ये ८९ मी. चा अचूक थ्रो करत पात्र ठरला. यानंतर नीरजने नंतर पत्रकारांसमोर विनेश फोगटच्या सनसनाटी विजयाचे कौतुक केले.
भालाफेक स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरी गाठल्यानंतर नीरज चोप्रा माध्यमांशी संवाद साधत होता. यादरम्यान विनेश फोगटच्या विजयावर बोलताना नीरज चोप्रा म्हणाला, “”हा विलक्षण विजय आहे. सुसाकीला पराभूत करणे हे खरंच अविश्वसनीय आहे. तिने (विनेश फोगट) जे प्रयत्न केले ते वाखणण्याजोगे आहेत. तिला पुढील फेरीसाठी शुभेच्छा!”
नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर त्याच्याकडून दुसरे सुवर्णपदक जिंकण्याची सर्वांनाच अपेक्षा आहे. यापूर्वी त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. केवळ नीरज चोप्राच नाही तर पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम यानेही पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीत अप्रतिम कामगिरी केली. अर्शद नदीमने ८६.५९ मीटर भालाफेक करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता भारत आणि पाकिस्तानचे हे दोन खेळाडू ८ ऑगस्टला होणाऱ्या अंतिम सामन्यात भिडताना दिसणार आहेत.