Neeraj chopra taking photo with Pakistani athlete Arshad Nadeem: भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहासाच्या पानांमध्ये आपले नाव नोंदवले. नीरजने अंतिम फेरीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमला मागे टाकत ८८.१७ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकणारा नीरज पहिला भारतीय ठरला आहे. ऐतिहासिक विजयानंतर नीरजचा पाकिस्तानी ॲथलीट अर्शद नदीमसोबतचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहणारे प्रत्येकजण भारताच्या गोल्डन बॉयला सलाम करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केवळ भारताच्याच नाही तर पाकिस्तानच्या चाहत्यांनाही हा व्हिडीओ खूप आवडला आहे. सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरजने नदीमला मिठी मारली. यानंतर जेव्हा तो आणि चेक रिपब्लिकचा याकुब वडवेज फोटो क्लिकसाठी एकत्र आले, तेव्हा नदीम त्याच्या शेजारी उभा होता. यानंतर नीरजने नदीमला सोबत येण्यास सांगितले.

व्हायरल व्हिडिओमध्ये नीरज चेक रिपब्लिकच्या याकूब वडवेजसोबत तिरंग्यासोबत फोटो क्लिक करताना दिसत आहे. यावेळी दोन्ही खेळाडूंच्या हातात आपापल्या देशाचा ध्वज होता. दरम्यान, नीरजची नजर अर्शद नदीमवर पडते आणि तो पाकिस्तानी अॅथलीटला फोटो क्लिक करण्यासाठी आपल्या जवळ बोलावतो. यावेळी अर्शदला घाई असते आणि तो आपल्या देशाचा ध्वजही आणू शकत नाही. मात्र, त्यानंतरही तो नीरजपर्यंत पोहोचतो आणि फोटो क्लिक करतो.

ही चॅम्पियनशिप १९८३ पासून आयोजित केली जात असून प्रथमच भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले आहे. चोप्राने फाऊलने सुरुवात केली पण दुसऱ्या प्रयत्नात आघाडी घेतली, जी शेवटपर्यंत टिकली. तिसर्‍या फेरीनंतर पाकिस्तानचा नदीमही दुसरा आला आणि शेवटी दोघांनीही पहिले दोन स्थान मिळवले.

हेही वाचा – World Athletics Championship 2023: पारुल चौधरीनने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये रचला इतिहास, मोडला राष्ट्रीय विक्रम

पहिल्या प्रयत्नात फाऊल झाल्यानंतर २५ वर्षीय चोप्राने दिवसातील दुसऱ्या प्रयत्नात सर्वोत्तम भाला फेकला. यानंतर त्याने ८६.३२ मीटर, ८४.६४ मीटर, ८७.७३ मीटर आणि ८३.९८ मीटर भाला फेकला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने हंगामातील सर्वोत्कृष्ट ८७.८२ मीटर भाला फेकून रौप्यपदक जिंकले. त्याचबरोबर झेक प्रजासत्ताकच्या याकुब वालेशने ८६.६७ मीटरच्या हंगामातील सर्वोत्तम थ्रोसह कांस्यपदक जिंकले.

नेमबाज अभिनव बिंद्रानंतर एकाच वेळी ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारा चोप्रा हा दुसरा भारतीय ठरला. बिंद्राने वयाच्या २३व्या वर्षी जागतिक अजिंक्यपद आणि वयाच्या २५व्या वर्षी ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले होते. २०२१ च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा चोप्रा पहिला भारतीय ठरला होता. २०२२ मध्ये युजीन येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने रौप्य पदक जिंकले. त्याआधी, २००३ मध्ये पॅरिस वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अंजू बॉबी जॉर्जने लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neeraj chopra taking photo with pakistani athlete arshad nadeem after winning the gold medal video went viral vbm