Diamond League Prize Money : भारताचा आणि जगातला अव्वल दर्जाचा भालाफेकपटू नीरज चोप्राने डायमंड लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत दुसरं स्थान पटकावलं आहे. अमेरिकेतल्या यूजीन शहरात खेळवल्या गेलेल्या डायमंड लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत नीरजने ८३.८० मीटर लांब भाला फेकला. तर चेक प्रजासत्ताकच्या जेकब वाडलेचने ८४.२३ मीटर दूर भाला फेकून विजेतेपदाला गवसणी घातली. अवघ्या ०.४४ मीटरच्या फरकाने जेकबने नीरजला मागे टाकत विजेतेपद पटकावलं.
दरम्यान, उपविजेत्या नीरज चोप्राला बक्षीस म्हणून १२,००० डॉलर्स (जवळपास १० लाख रुपये) इतकी रक्कम मिळाली आहे. याआधी दोहा येथील डायमंड लीग आणि लॉसन डायमंड लीग स्पर्धेत विजेतेपदासह नीरजला प्रत्येकी १०,००० डॉलर्स (जवळपास ८.३ लाख रुपये) मिळाले होते. तसेच झ्युरीच येथे खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत उपविजेतपदासह त्याला ६,००० डॉलर्स (जवळपास ५ लाख रुपये) इतकं बक्षीस मिळालं होतं.
डायमंड लीगच्या अंतिम फेरीत नीरज त्याच्या नेहमीच्या लयीत नव्हता. तसेच त्याचे दोन प्रयत्न फाऊल झाले. तर उर्वरित तीन प्रयत्नांमध्ये नीरज त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. तर जेकब वाडलेचने पहिल्या थ्रोपासूनच आघाडी कायम ठेवली आणि जेतेपद पटकावलं.
हे ही वाचा >> Asian Games : भारताच्या महिला आणि पुरुष संघांमध्ये मोठे बदल, दोन दुखापतग्रस्त खेळाडू संघाबाहेर
डायमंड लीग २०२३ च्या अंतिम फेरीतली नीरज चोप्राची कामगिरी
पहिला प्रयत्न : फाऊल
दुसरा प्रयत्न : ८३.८० मीटर
तिसरा प्रयत्न : ८१.३७
चौथा प्रयत्न : फाऊल
पाचवा प्रयत्न : ८०.७४ मीटर
सहावा प्रयत्न : ८०.९० मीटर