नवी दिल्ली : लुसाने येथे होणाऱ्या डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी स्नायूंच्या दुखापतीतून सावरलेल्या नीरज चोप्राच्या कामगिरीकडे क्रीडाक्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.

या स्पर्धेत चांगली कामगिरी करून नीरजला पुढील महिन्यात झुरिच येथे होणाऱ्या डायमंड लीग अंतिम स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल. नीरज सध्या चौथ्या स्थानावर आहे.

नीरजला दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. स्पर्धेच्या दोन दिवस आधी त्याने माघारीचा निर्णय घेतला. त्याला चार आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता.

डायमंड लीग आयोजकांनी १७ ऑगस्ट रोजीच जाहीर केलेल्या स्पर्धकांच्या यादीत नीरजच्या नावाचा समावेश होता. फक्त, त्यावेळी आयोजकांनी त्याच्या नावापुढे तंदुरुस्तीवर नीरजचा सहभाग अवलंबून असल्याचे नमूद केले होते. नीरजनेच तंदुरुस्त असल्याचे जाहीर करून स्पर्धेतील सहभाग निश्चित केला.