Neeraj Chopra in World Athletics Championships 2023: तमाम भारतीयांच्या आशा पूर्ण करत भालाफेकपटू नीरज चोप्रानं रविवारी मध्यरात्री देशाला जागतिक अॅखलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून दिलं. या विजयासह नीरज चोप्रानं इतिहास घडवला. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरज चोप्रानं भारताला पहिलं वहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. गेल्या वर्षी नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. या वर्षी मात्र आपल्या भात्यात जगभरातल्या महत्त्वाच्या स्पर्धांची विजेतेपदं घेऊन बुडापेस्टला दाखल झालेल्या नीरजनं जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकवून देत इतिहास घडवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्शद नदीमचं कडवं आव्हान!

पाकिस्तानच्या अर्शद नदीमचं नीरज चोप्राला मोठं आव्हान होतं. अर्शदची आत्तापर्यंतची सर्वोत्तम भालाफेक ९० मीटरहून जास्त होती. त्यामुळे नीरजला नदीम कडवी टक्कर देणार असं चित्र दिसत होतं. झालंही तसंच. अर्शदनं पहिल्या फेरीत ७४.८० मीटर तर दुसऱ्या फेरीत थेट ८२.१८ मीटर टप्प्यापर्यंत भालाफेक केली. तिसऱ्या फेरीत तर त्यानं थेट ८७.८२ मीटरपर्यंत भालाफेक केल्यामुळे नीरजला त्याच्याही पुढे भालाफेक करण्याचं आव्हान होतं. मात्र, नदीमला लीलया मागे टाकत नीरजनं सुवर्णपदक मिळवलं!

इथे पाहा नीरजचा विजयी थ्रो!

नीरजचा ‘गोल्डन थ्रो’

नीरज चोप्रानं नदीमला मागे टाकताना तब्बल ८८.१७ मीटरच्या टप्प्यावर भालाफेक केली. खरंतर नीरजच्या सर्वोत्तम पाच कामगिरींपेक्षाही हा टप्पा कमी असला, तरी त्याला इतिहास घडवण्यासाठी आणि भारताच्या नावावर पहिलं सुवर्णपदक करण्यासाठी ही कामगिरी पुरेशी ठरली. याआधी ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजनं सुवर्णपदक पटकावलं आहे.

नीरजबरोबरच पाचव्या स्थानी भारताकडून किशोर जेना (८४.७७ मीटर) आणि सहाव्या स्थानी डी. पी. मनू (८४.१४ मीटर) यांच्या कामगिरीनं भालाफेक प्रकारात भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळा ठसा उमटल्याची भावना क्रीडाविश्वातून व्यक्त होत आहे.

पहिल्या फेरीत फाऊल

नीरज चोप्राचा पहिल्याच फेरी फाऊल झाल्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये धाकधुक वाढली होती. पण पुढच्याच फेरीत नीरजनं त्याच्या स्टाईलमध्ये कमबॅक केलं. नीरजच्या हातातून भाला सुटताच तो कुठे पडला हेही न पाहाता आत्मविश्वासानं नीरजनं मागे वळून चाहत्यांना अभिवादन करत आनंद व्यक्त केला. आपल्या सुवर्णकामगिरीचा अंदाज नीरजला हातातून भाला सुटताच आला होता!

नीरज चोप्राची भन्नाट आकडेवारी!

सुवर्णपदक मिळालं असलं, तरी ही नीरज चोप्राची सर्वोत्तम कामगिरी खचितच नाही. आत्तापर्यंत नीरजनं १० वेळा ८८ मीटरहून जास्त टप्प्यावर भालाफेक केली आहे. ८५ मीटरहून जास्त टप्प्यावर २६ वेळा तर ८२ मीटरहून जास्त टप्प्यावर ३७ वेळा भालाफेक केली आहे. यंदाच्या हंगामानंतर झालेल्या स्पर्धांमध्ये ८९.९४ मीटर ही नीरजची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. तर सर्वात कमी लांबीचा त्याचा टप्पाही ८८.१३ मीटर आहे!

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neeraj chopra wins gold at world athletics championship against pakistan nadeem pmw