पीटीआय, नवी दिल्ली
भारताचा दोम्माराजू गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यातील बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीच्या दर्जावर काहींकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. डिंगच्या चुकीमुळे गुकेश जगज्जेता झाल्याची टीकाही केली जात आहे. मात्र, कारकीर्दीत मोठा टप्पा गाठल्यानंतर टीका होतेच, त्याकडे दुर्लक्ष करणे गरजेचे आहे, असा सल्ला पाच वेळच्या विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने आपला शिष्य गुकेशला दिला आहे.
हेही वाचा : आनंदनंतरचा विश्वनाथ! सर्वांत तरुण बुद्धिबळ जगज्जेता डी. गुकेश
यंदाच्या लढतीवर टीका करणाऱ्यांमध्ये माजी जगज्जेता व्लादिमिर क्रॅमनिक आघाडीवर होता. या लढतीच्या दर्जावर टीका करताना ‘आपले ज्यावर प्रेम होते अशा बुद्धिबळाचा आता अंत झाला आहे,’ असे क्रॅमनिक म्हणाला. तसेच १४व्या डावात डिंगने केलेली चूक ही एखाद्या लहान मुलाने करावी अशी होती, अशी टिप्पणीही क्रॅमनिकने केली. त्याचप्रमाणे पाच वेळचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसनही गुकेश आणि डिंग यांच्या खेळाने फारसा प्रभावित नव्हता. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला आनंदने गुकेशला दिला आहे.
हेही वाचा : कार्लसनकडून गुकेशचे कौतुक, जगज्जेतेपदासाठी लढण्यास मात्र नकार
‘‘मी खूप खूश आहे. गुकेशच्या ऐतिहासिक यशाचा मी साक्षीदार होतो. टीका ही होतच राहणार. अगदी खरे सांगायचे तर तुम्ही कारकीर्दीत एक मोठा टप्पा गाठलात की तुमच्यावर होणारी टीका वाढते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. गुकेशची कामगिरी किती खास आहे, जगज्जेतेपदाच्या लढतीपर्यंत पोहोचण्यासाठीही त्याने किती मेहनत घेतली हे सर्वांना ठाऊक आहे. ऑलिम्पियाड स्पर्धेतील त्याची कामगिरीही वाखाणण्याजोगी होती. ‘कँडिडेट्स’ स्पर्धेत त्याने अनेक नामांकितांना मागे सोडले. त्यामुळे आता होणाऱ्या टीकेकडे त्याने फार लक्ष देऊ नये. तुम्ही जगज्जेते व्हाल आणि तुमच्यावर टीका होणार नाही, हे शक्यच नाही,’’ असे आनंद म्हणाला.