नेपाळ क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू संदीप लामिछाने याच्यावर १८ वर्षीय तरुणीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. २०२२ मध्ये लामिछाने याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर त्याला अटकही करण्यात आली. या वर्षाच्या सुरुवातीला काठमांडू जिल्हा न्यायालयाने लामिछाने याला दोषी ठरवले होते. त्याला न्यायालयाने ८ वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर नेपाळ क्रिकेट असोसिएशननेही त्याला निलंबित केले.
नेपाळचा क्रिकेटपटू संदीप लामिछनेची बलात्कार प्रकरणातून निर्दोष मुक्तता
नेपाळचा निलंबित राष्ट्रीय क्रिकेटपटू संदीप लामिछाने याची बुधवारी पाटण उच्च न्यायालयाने बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. न्यायमूर्ती सूर्यदर्शन देव भट्ट आणि अंजू उप्रेती ढकल यांच्या खंडपीठाने काठमांडू जिल्हा न्यायालयाने आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा रद्द केली. पाटण उच्च न्यायालयाचे प्रवक्ते तीर्थराज भट्टराई यांच्या म्हणण्यानुसार खंडपीठाने पुराव्याअभावी निकाल बदलला.
हेही वाचा – IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?
पुढील महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. त्यात नेपाळचा संघही सहभागी होणार आहे. संदीप लामिछानेचा टी-२० विश्वचषकासाठी नेपाळच्या संघात समावेश केला जाऊ शकतो. नेपाळने २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आधीच आपला संघ जाहीर केला आहे, परंतु संदीप लामिछानेचा त्यात समावेश नव्हता. दरम्यान, लामिछानेला आता हायकोर्टातून क्लीन चिट मिळाल्यानंतर त्याचा संघात समावेश होण्याची शक्यता वाढली आहे. २५ मे पर्यंत संघ विश्वचषकाच्या संघात बदल करू शकतात. त्यामुळे संदीप लामिछनेला अजूनही यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी आहे.
१० जानेवारी रोजी न्यायाधीश शिशिर राज ढकल यांच्या कोर्टाने नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याला दोषी ठरवले होते. शिक्षा म्हणून त्याला तुरुंगवास आणि पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला. या ५ लाख रुपयांपैकी ३ लाख रुपये दंड आणि उर्वरित रक्कम पीडितेला नुकसानभरपाई म्हणून द्यायची होती. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात क्रिकेटपटू आणि सरकारी वकील दोघेही उच्च न्यायालयात गेले.
हेही वाचा – RCB vs CSK सामन्यावर पावसाचे सावट, पावसामुळे मॅच रद्द झाल्यास कोणता संघ IPL मधून बाहेर होणार?
यानंतर, ४ नोव्हेंबर २०२३ रोजी, काठमांडू जिल्हा न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर क्रिकेटपटूला सुंधरा येथील मध्यवर्ती कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले. परंतु, १२ जानेवारी २०२४ रोजी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ध्रुवराज नंदा आणि रमेश ढकल यांनी तपास सुरू असतानाच त्याची जामिनावर सुटका केली. सुटकेसाठी त्याला २० लाखांचा जामीन द्यावा लागला. मात्र, न्यायालयाने त्याला परदेशात जाण्यास मज्जाव केला होता आणि काठमांडूबाहेर गेल्यास प्रथम पोलिसांना कळवावे, असे आदेश दिले होते.