ऑस्टेलियावर ‘सडन डेथ’मध्ये मात; बेल्जियमशी अंतिम सामना

तब्बल १५,००० चाहत्यांचा क्षणाक्षणाला ह्दयाचा ठोका चुकवणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात झुंजार वृत्तीच्या नेदरलँड्सने बलाढय़ ऑस्ट्रेलियाला सडन डेथमध्ये ४-३ (एकूण ६-५) अशी सरशी साधून अंतिम फेरीत धडक मारली. सामनावीर व गोलरक्षक पिर्मिन ब्लॅकच्या अप्रतिम बचावाच्या बळावर नेदरलँड्सने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागील विश्वचषकातील अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढला. आता बेल्जियमचा अंतिम सामना नेदरलँड्शी होईल.

चार सत्रानंतर २-२ अशा बरोबरीत सुटलेल्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटनंतरदेखील ५-५ अशी बरोबरी राहिली होती. मात्र सडन डेथमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बॅल डेनिएलला अपयश आल्याने नेदरलँड्सने ६-५ असा विजय मिळवला व संपूर्ण संघाने एकच जल्लोष केला.

९व्या मिनिटाला ग्लेन शुर्मनने संघासाठी पहिला गोल नोंदवला. तर दुसऱ्या सत्रातील पाचव्या मिनिटास (२०वे) अ‍ॅस व्हॅनने संघासाठी दुसरा गोल करून ऑरेंज आर्मीला २-० अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सत्रात अखेरच्या क्षणी ऑस्ट्रेलियाच्या टिम हॉवर्डने पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करून सामन्यात चुरस निर्माण केली. तर सामन्यातील शेवटच्या मिनिटाला कर्णधार एडी ओकेंडनने गोल करून ऑस्ट्रेलियाला २-२ अशी बरोबरी साधून दिली.

तत्पूर्वी, धारदार आक्रमणाला लाभलेल्या उत्तम साथीच्या बळावर बेल्जियमने पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडचा ६-० असा धुव्वा उडवत एकतर्फी विजय मिळवला. बेल्जियमसाठी टॉम बून (८वे मिनिट), सिमॉन गॉगनर्ड (१९), सेड्रिक चार्लीयर (४२), अ‍ॅलेक्झांडर हेंड्रिक्स (४५ व ५०) आणि सबास्टियन डॉकियर (५३) यांनी गोल केले.

Story img Loader