नेदरलँड्सला तीन वेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारूनही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्याची नामुष्की, तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदासाठी उत्सुक असलेला अर्जेटिनाचा संघ, जगातील सर्वोत्तम ड्रिबलर्स असलेले आर्येन रॉबेन विरुद्ध लिओनेल मेस्सी अशी ‘काँटे की टक्कर’ विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अनुभवायला मिळणार आहे. बुधवारी मध्यरात्री रंगणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अर्जेटिना आणि नेदरलँड्स हे संघ अंतिम फेरीचे दार ठोठावण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
लिओनेल मेस्सीने झळकावलेल्या चार गोलमुळे अर्जेटिनाने १९९०नंतर प्रथमच उपांत्य फेरीत धडक मारली आहे, पण उपांत्य फेरीत अर्जेटिनाचा संघ एकदाही पराभूत झालेला नाही, हे नेदरलँड्सला ध्यानात घ्यावे लागणार आहे. नेदरलँड्सने स्पर्धेत आतापर्यंत कोलंबियानंतर सर्वाधिक १२ गोल लगावले असून त्यांच्या यशात रॉबेन आणि रॉबेन व्हॅन पर्सी (प्रत्येकी तीन गोल) तसेच मेम्फिस डेपे (दोन गोल) यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. रॉबेनचे चेंडूवरील कौशल्य, हेच ‘ऑरेंज आर्मी’चे यशाचे रहस्य आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत ऊर्जा, वेग, अप्रतिम ड्रिब्लिंग आणि भन्नाट गोल असा नजराणा चाहत्यांना अनुभवता येणार आहे.
बाद फेरीनंतर नेदरलँड्सला दोनच गोल करता आल्यामुळे त्यांची मदार पुन्हा एकदा व्हॅन पर्सीवर असणार आहे. व्हॅन पर्सीने वेगाच्या अभावामुळे कोस्टा रिकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात गोल करण्याच्या दोन सुरेख संधी वाया घालवल्या. मधल्या फळीत नेदरलँड्सला नायजेल डे जाँगची कमतरता जाणवणार आहे. त्याच्या जागी लेरॉय फेर याला संधी मिळण्याची शक्यता आहे. स्वित्र्झलडविरुद्धच्या सामन्यात अतिरिक्त वेळेत गोल करून अर्जेटिनाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारा अँजेल डी मारिया दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाही. हा अर्जेटिनासाठी फारच मोठा धक्का आहे. मात्र सर्जिओ अॅग्युरो दुखापतीतून सावरला असल्याने अर्जेटिनाला हायसे वाटले असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा