भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडने ही जबाबदारी सांभाळण्यासाठी आपली संमती दिली आहे. द्रविडचा करार प्रथम २०२३ पर्यंत असेल. अहवालानुसार, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह, यांनी द्रविडची भेट घेतली. दोघांनी द्रविडला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी विनंती केली होती, अखेर ती विनंती द्रविडने मान्य केल्याचे वृत्त आले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, टी-२० विश्वचषकानंतर द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून टीम इंडियामध्ये सामील होईल. म्हणजेच, मुख्यतः प्रशिक्षक म्हणून द्रविडची पहिली मोहिम न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका असेल. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आयपीएल फायनलनंतर या वृत्तपत्राला सांगितले, की द्रविडने भारतीय क्रिकेट संघाचा नवा प्रशिक्षक होण्याचे मान्य केले आहे. तो लवकरच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालकपद सोडणार आहेत. मात्र, याबाबत बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत निवेदन आलेले नाही.
द्रविड भारताचा प्रशिक्षक होणार हे समजताच नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आनंद साजरा केला आहे.
हेही वाचा – HBD LORD: वजनानं जास्त असलेला, सचिनच्या जर्सीमुळं ट्रोल झालेला अन् धोनीमुळं ट्रॅकवर परतलेला खेळाडू!
४८ वर्षीय द्रविड सध्या बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहत असून यापूर्वीही त्याने श्रीलंकेच्या दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून काम केल आहे. द्रविड १९ वर्षांखालील संघ आणि भारत अ संघाला प्रशिक्षणही देत आहे. अशाप्रकारे द्रविडला मुख्य संघाला प्रशिक्षण देण्यासाठी विचारणा झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मात्र द्रविडने तरुणांना क्रिकेटचे धडे देण्याला आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहण्याला प्राधान्य दिले आहे. यापूर्वीही द्रविडने २०१६ आणि २०१७ साली अशाच पद्धतीची ऑफर नाकारली होती. आपण जे काम करतोय त्यामध्ये आपल्याला अधिक रस असल्याचे सांगत द्रविडने मुख्य संघाला प्रशिक्षण देण्याऐवजीन तरुण खेळाडूंना तयार करण्यासाठी क्रिकेट अकदामीमध्येच काम करण्याला प्राधान्य दिले होते.