भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यापर्यंत ही चर्चा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासंदर्भात होती. आता या दोन देशांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या टी २० मालिकेसंदर्भात चर्चा होऊ लागली आहे. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा दोन विकेट्स राखून पराभव केला. तब्बल २०९ धावांचं आव्हान भारतानं सूर्यकुमार यादव, इशान किशन, यशस्वी जैस्वाल व रिंकू सिंग यांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर दोन विकेट्स राखून पार केलं. मात्र, भारताच्या विजयानंतर नेटिझन्स भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याच्यावर नाराज झाले असून एक्सवर (ट्विटर) ट्रोलिंग सुरू झालं आहे. ‘सर्वात स्वार्थी माणूस’ म्हणून जैस्वालला ट्रोल केलं जात आहे.
काय झालं सामन्यात?
ऑस्ट्रेलियानं पहिली फलंदाजी करताना भारतासमोर २०८ धावांचा डोंगर उभा केला. यात इंग्लिसनं तडकावलेलं वेगवान शतक भारतीय गोलंदाजांसाठी दुस्वप्नच ठरलं! पण त्यानंतर भारतीय फलंदाजांनीही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा त्याचप्रकारे समाचार घेतला. सलामीसाठी उतरलेल्या यशस्वी जैस्वालनं पहिल्या षटकात आक्रमक सुरुवात केली. दुसऱ्या षटकातही त्यानं तोच बाणा कायम ठेवला होता. मात्र, यावेळी केलेली एक चूक त्याला चांगलीच महागात पडली.
यशस्वी जैस्वालनं चेंडू मारून दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. पहिली धाव त्यांनी अगदी सहज पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी यशस्वीनं ऋतुराज गायकवाडला क्रीज सोडायला भाग पाडलं. पण ऋतुराज निम्म्या खेळपट्टीपर्यंत आलेला असताना जैस्वाल माघारी फिरला. तोपर्यंत चेंडू ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक वेडच्या हातात पोहोचला होता. त्यानं ऋतुराज गायकवाडला धावबाद केलं.
नेटिझन्स जैस्वालवर नाराज!
दरम्यान, या प्रकारावरून भारतीय क्रिकेट चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. ऋतुराज गायकवाड धावबाद झाल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. “जैस्वाल हा सर्वात स्वार्थी तरुण क्रिकेटपटू आहे”, अशी टीका त्याच्यावर केली जात आहे.
काही युजर्सनं सलामीवीराच्या जागेसाठी ऋतुराज गायकवाड आपला थेट स्पर्धक असल्यामुळेच जैस्वालनं त्याला धावबाद केल्याचाही दावा केला आहे.
काहींनी जैस्वालच्या चुकीच्या निर्णयावर बोट ठेवलं आहे. दुसरी धाव घेण्यासाठी ऋतुराज गायकवाडला बोलावण्याचा जैस्वालचा निर्णय चुकीचा होता, अशा पोस्ट येऊ लागल्या आहेत. जैस्वालनं अशा प्रकारे ऋतुराज गायकवाडला धावबाद करण्याची ही पहिलीच वेळ नसल्याची बाब काहींनी अधोरेखित केली आहे. त्यासाठी एका सामन्यातला फोटोही शेअर करण्यात आला आहे, ज्यात ऋतुराज व यशस्वी एकाच बाजूच्या क्रीजकडे धावताना दिसत आहेत.
काहींनी तर यशस्वी जैस्वालला त्याच्या इन्स्टाग्राम कमेंट्स बंद करण्याचाही सल्ला दिला आहे.
या सगळ्या प्रकारानंतर आता रविवारी होणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताच्या या सलामीच्या जोडीकडे सगळ्यांचं लक्ष असेल.