वेस्ट इंडिज दौऱ्यात बाजी मारल्यानंतर भारतीय संघाच्या घरच्या मैदानावरील सामन्यांना सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धर्मशाळा येथे खेळवण्यात येणारा पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला. २०२० साली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआय आणि भारतीय संघ व्यवस्थापनाने आतापासून कंबर कसायला सुरुवात केली आहे. अधिकाधीक नवोदीत आणि तरुण खेळाडूंना संधी देण्याचा भारतीय संघ व्यवस्थापनाचा विचार आहे. मात्र संघात स्थान टिकवून ठेवण्याच्या मोजक्या संधी मिळतील, त्याचा वापर करा, असा सूचक इशारा कर्णधार विराट कोहलीने संघातील तरुण खेळाडूंना दिला आहे.

“विश्वचषकाआधी आम्हाला ३० सामने खेळायला मिळतील. संघाचा विचार केला तर आमची रणनिती ठरली आहे. मी ज्यावेळी भारतीय संघात पदार्पण केलं, त्यावेळी मी देखील मला सिद्ध करण्यासाठी खूप साऱ्या संधी मिळतील अशी अपेक्षा केली नव्हती. तुम्हाला ४-५ संधी मिळतील, त्याचा तुम्हाला लाभ घेता आला पाहिजे. आम्ही सध्या या तोडीचा खेळाडू शोधत आहोत.” Star Sports वाहिनीशी बोलत असताना विराट बोलत होता. जो खेळाडू मिळालेल्या संधीचं सोन करेल तो संघात आपलं स्थान टिकवेलं, हे देखील विराटने स्पष्ट केलं.

टी-२० विश्वचषकासोबतच भारत सध्या सुरु असलेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेकडेही लक्ष ठेवून आहे. या स्पर्धेसाठीही नवीन खेळाडूंना संधी देण्याचा विचार असल्याचं विराटने बोलून दाखवलं. दरम्यान पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-२० सामना बुधवारी चंदीगढच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

Story img Loader