वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रवीचंद्रन अश्विनला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी युवा फिरकीपटू कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला आहे.  १९ वर्षांखालील भारतीय संघाचा कुलदीप भाग होता. इंडियन प्रीमिअर लीग आणि सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्सतर्फे खेळताना कुलदीपने चमकदार कामगिरी केली आहे. मात्र अद्याप त्याने प्रथम श्रेणी दर्जाचा तसेच ‘अ’ संघासाठी एकही सामना खेळलेला नाही.
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेल्या संघातून फिरकीपटू करण शर्माला वगळण्यात आले असून त्याच्या जागी अनुभवी अमित मिश्राला संघात संधी देण्यात आली आहे. हाताला झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा या मालिकेसाठी उपलब्ध नसून, त्याच्या जागी मुरली विजयला संघात समाविष्ट करण्यात आले आहे. स्टुअर्ट बिन्नी, धवल कुलकर्णी, संजू सॅमसन यांना या संघात स्थान मिळू शकलेले नाही.
२०१५ विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टिकोनातून निवडलेल्या या संघात युवराज सिंग, हरभजन सिंग, गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग या अनुभवी खेळाडूंचा विचार करण्यात आलेला नाही.
पहिला एकदिवसीय सामना ८ ऑक्टोबरला कोची येथे तर दुसरा ११ ऑक्टोबरला दिल्लीत होणार आहे. विशाखापट्टणम येथे तिसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे. चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी संघाची निवड नंतर होईल.
भारतीय संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, उमेश यादव, मुरली विजय, कुलदीप यादव.