आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाने क्रिकेट विश्व हादरून गेले असून आता हे गैरव्यवहार रोखण्यासाठी नवीन कायदा जुलै किंवा ऑगस्टपर्यंत येईल, असा दावा सरकारने केला आहे. कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी या कायद्याची संरचना करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘जुलै किंवा ऑगस्ट दरम्यान संसदेमध्ये स्पॉट-फिक्सिंग कायद्याचा मसुदा मांडण्यात येईल आणि यावर चर्चा करून सर्व मान्यतेने अमलात येईल,’ अशी माहिती सिब्बल यांनी दिली.
सिब्बल पुढे म्हणाले की, ‘‘संसदेच्या पावसाळी अधिवेशनात स्पॉट-फिक्सिंग संदर्भातील कायद्याचा मसुदा संसदेत सादर करण्यात येईल आणि यामध्ये सर्व खेळांचा समावेश असेल. या कायद्याचा पहिला मसुदा काही दिवसांमध्ये तयार करण्यात येईल आणि तो क्रीडा मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल, त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षांचीही आम्ही मते जाणून घेऊ. सर्वाची मते घेतल्यावरच पुढचे पाऊल उचलण्यात येईल. जर राजकीय इच्छाशक्ती असेल तर या कायद्याला लवकर संमती मिळेल.’’
‘‘विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीने हा स्पॉट-फिक्सिंगबाबत कायदा बनवण्याबाबत मागणी केली असली तरी आम्हाला सर्वाचे मत घ्यावे लागेल,’’ असे सिब्बल यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ‘‘खेळ भावनेला कुठेही धक्का लागणार नाही, याची आम्ही काळजी घेऊच. पण दुसरीकडे हा कायदा एवढाही शिथिल नसेल की दोषी यामधून सुटू शकतील. या कायद्यामध्ये योग्य तो समन्वय राखण्याचा आमचा प्रयत्न असेल. या नवीन कायद्याचा तपास करणाऱ्यांना नक्कीच फायदा होईल.’’
हा कायदा बनवायला उशीर झाला का, असे विचारल्यावर सिब्बल म्हणाले की, ‘‘हो, मला तरी असेच वाटते. नव्वदच्या दशकात जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना पहिल्यांदा सामना निश्चितीचे प्रकरण पुढे आले होते, त्यानंतर आतापर्यंत या विषयावर बरेच वादविवाद झाले, पण कायदा आला नाही.’’

Story img Loader