पाच क्षेत्ररक्षक ३० यार्डाच्या वर्तुळात ठेवण्याच्या नव्या नियमाची मला अतिशय मोलाची मदत झाली, असे द्विशतकवीर रोहित शर्माने सांगितले. ‘‘द्विशतकाकडे मी खरेच गांभीर्याने पाहिले नव्हते. मी फक्त माझी खेळी साकारत गेलो. जयपूरमध्ये मी खेळी उभारण्यासाठी थोडा वेळ घेतला आणि हीच माझी योजना होती. बंगळुरूला मी जेव्हा १८० धावांच्या नजीक पोहोचलो, तेव्हा आक्रमण केले. क्षेत्ररक्षणाच्या नव्या नियमामुळे मला मुक्तपणे धावा काढायला मदत मिळाली,’’ असे रोहितने सांगितले.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर शनिवारी रोहित नावाचे वादळ घोंगावले. त्याने सर्वाधिक १६ षटकारांच्या विक्रमाच्या साहाय्याने आपली २०९ धावांची खेळी उभारली. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना फलंदाजीच्या शैलीत आमूलाग्र बदल झाला. याचप्रमाणे इंग्लंडमध्ये सलामीवीर म्हणून खेळताना संघाच्या डावाला कसा आकार द्यायचा, जेणेकरून मधल्या फळीतील फलंदाजांना नंतर सोपे जाईल, याचे महत्त्व उमगले, असे रोहितने यावेळी सांगितले.
जेम्स फॉल्कनरने साकारलेल्या ११६ धावांच्या खेळीविषयी रोहित म्हणाला की, ‘‘टास्मानियाच्या फॉल्कनरने अप्रतिम खेळी केली आणि जवळपास सामना आमच्या हातातून निसटणार होता. मोहालीतील त्याची तडाखेबंद फलंदाजी पाहूनच त्याला कमी लेखता येणार नाही, याची भारतीयांना कल्पना होती.’’
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहितची मधल्या फळीतील फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. याविषयी तो म्हणाला, ‘‘निवड समितीने माझी मधल्या फळीतील फलंदाज म्हणून निवड केली आहे. भविष्यात काय दडले आहे, हे मला सांगता येणार नाही. कसोटी क्रिकेटमधील पदार्पणासाठी मी सहा वष्रे वाट पाहात आहे. माझी कामगिरी चांगली झाली तर मी स्वत:ला जगातील सर्वात आनंदी व्यक्ती समजेन.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा