डेव्हिस चषकात खेळण्याचे संकेत; टेनिस संघटनेबरोबर वाद मिटण्याची शक्यता
नवीन वर्षांच्या सुरुवातीला टेनिसपटू महेश भूपतीने आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. दुहेरीत भारताच्या सर्वोत्तम टेनिसपटूंपैकी असलेला भूपती अखिल भारतीय टेनिस संघटनेबरोबरचा वाद मागे ठेवत डेव्हिस चषक लढतीत खेळताना दिसणार आहे. कोरियाविरुद्धच्या डेव्हिस चषक लढतीत सहभाही होणार असल्याचे संकेत भूपतीने दिले आहेत.
ऑलिम्पिकसाठी भारतीय टेनिस संघ निवडीवेळी भूपतीने रोहन बोपण्णा साथीदार म्हणून असावा यासाठी अट्टहास केला होता. तसेच लिएण्डर पेससह खेळण्यासही त्याने ठाम नकार दिला होता. भूपती-बोपण्णाच्या हट्टापुढे नमते घेत टेनिस संघटनेने ऑलिम्पिकसाठी दोन संघ पाठवण्याचा निर्णय घेतला. ऑलिम्पिकचे सूप वाजल्यानंतर मात्र टेनिस संघटनेने सूडास्त्र बाहेर काढत भूपती-बोपण्णाचा २०१४ पर्यंत डेव्हिस चषकासाठी भारतीय संघनिवडीसाठी विचार होणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
भूपती-बोपण्णाने या अघोषित बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली. कर्नाटक उच्च न्यायालयाने बंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय दिला.
मी डेव्हिस चषकासाठी उपलब्ध असल्याचे जाहीर केले. टेनिस संघटनेने माझ्या उपलब्धतेविषयी ई-मेलद्वारे विचारणा केली आणि मी त्यांना होकार कळवल्याचे भूपतीने सांगितले.
न्यायालयाचा निर्णय जाहीर होऊन अनेक महिने झाले. संघटनेने मला स्वत:हून उपलब्धतेविषयी विचारले आणि मी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांच्या या भूमिकेचे मी स्वागत करतो असे भूपतीने पुढे सांगितले.
लिएण्डर पेससह खेळणार का यासंदर्भात विचारले असता भूपती म्हणाला, ‘मी उपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे हे महत्त्वाचे आहे. मी कोणाबरोबर खेळणार ही चर्चा निर्थक आहे. पेस, बोपण्णा आणि मी नवीन सहकाऱ्यांसह या स्पर्धेत खेळणार आहोत. त्यामुळे आमची कामगिरी पाहणे रंजक ठरणार आहे.

युकी भांब्रीचे आव्हान संपुष्टात
चेन्नई : भारताचा युवा टेनिसपटू युकी भांब्रीला चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. नेदरलँण्ड्सच्या रॉबिन हासविरुद्ध युकीने जोरदार संघर्ष केला. मात्र हासने हा सामना ७-५, ६-३ अशा फरकाने जिंकला.  दरम्यान प्रकाश अमृतराजने पात्रता फेरीच्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवत मुख्य फेरी गाठली. प्रकाशने जिद्दीने खेळ करत  ५-७, ६-४, ६-४ असा विजय मिळवला.

Story img Loader