NZ vs PAK Tri Series Rachin Ravindra Injured: पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यानच्या वनडेदरम्यान न्यूझीलंडचा क्रिकेटपटू रचीन रवींद्रला झालेल्या दुखापतीमुळे पाकिस्तानवर पुन्हा एकदा जोरदार टीका होत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तब्बल तीन दशकांनंतर पाकिस्तानात आयसीसी स्पर्धेचं आयोजन होत आहे. मात्र ही स्पर्धा नक्की पाकिस्तानातच होणार का याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.
पाकिस्तानच्या डावादरम्यान ३८व्या षटकात ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर खुशदिलने फटका खेळला. रचीन तेव्हा डीप स्क्वेअर लीग इथे क्षेत्ररक्षण करत होता. चेंडू पकडण्यासाठी तो पुढे सरसावला मात्र चेंडू त्याच्या कपाळावर जाऊन आदळला. या आघातामुळे रचीन खाली पडला. काही वेळानंतर तो सावध झाला. पण तोवर रक्त वाहू लागलं होतं. न्यूझीलंड संघाच्या डॉक्टर तसंच राखीव खेळाडूंनी मैदानात धाव घेतली. पाकिस्तान संघाच्या डॉक्टरांनाही मैदानात धाव घेतली. चाहतेही काही क्षण भांबावून गेले. रचीनवर मैदानातच उपचार करण्यात आले. रक्त थांबावं यासाठी आईसपॅक लावण्यात आला. रचीनची काँकशन टेस्ट घेण्यात आली. बाकी व्यवस्थित असल्याने रचीन वैद्यकीय चमूच्या साथीने मैदानाबाहेर गेला.
रचीनच्या दुखापतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यासाठी उपचार सुरू आहेत. तो लवकरात लवकर बरा होईल असं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने म्हटलं आहे. दरम्यान कृत्रिम प्रकाश यंत्रणा नीट नसल्यामुळे रचीनला चेंडू दिसला नाही आणि अपघात झाला असं म्हणत अनेकांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका केली आहे. खेळाडूंच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य हवं. पाकिस्तानला ते जमत नसेल तर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा दुबईत खेळवावी असंही काही चाहत्यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानचे माजी कर्णधार रशीद लतीफ यांनीही कृत्रिम प्रकाशयंत्रणेवर टीका केली आहे. ‘एलईडी लाईट्सचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. बल्बमधून प्रकाशाचा मोठा झोत बाहेर पडतो. चेंडू वेगाने तुमच्या दिशेने येतो तेव्हा प्रकाशाच्या तीव्र झोतामुळे चेंडू नेमका कुठे आहे ते टिपता येत नाही’, असं लतीफ म्हणाले.
चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी म्हणून पाकिस्तानात तिरंगी मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. यजमान पाकिस्तानसह दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे संघ यामध्ये सहभागी झाले आहेत. याच मालिकेतला पहिला सामना काल लाहोर इथे खेळवण्यात आला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ग्लेन फिलीप्सच्या तडाखेबंद शतकाच्या बळावर ३३० धावांचा डोंगर उभारला. फिलीप्सने ७४ चेंडूत ६ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद १०६ धावांची अफलातून खेळी साकारली. डॅरेल मिचेलने ८१ तर केन विल्यमसनने ५८ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. मायकेल ब्रेसवेलने २३ चेंडूत ३१ धावांची उपयुक्त खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानचा डाव २५२ धावांतच संपुष्टात आला. फखर झमानने ८४ धावांची एकाकी झुंज दिली. न्यूझीलंडतर्फे मॉट हेन्री आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी ३ विकेट्स पटकावल्या. फिलीप्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये मैदानांचं नूतनीकरण करण्यात आलं आहे. मात्र ही मैदानं आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आयोजनाकरता तयार आहेत का याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेत. भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याने भारताचे सामने दुबईत खेळवण्यात येणार आहेत. उर्वरित सामने मात्र पाकिस्तानात होणार आहेत.