New Zealand squad announced for Champions Trophy 2025 : न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी, किवी क्रिकेट बोर्डाने केन विल्यमसनच्या जागी फिरकी अष्टपैलू मिचेल सँटनरला आपल्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे, जो प्रथमच आयसीसी स्पर्धेत कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. अलीकडेच, सँटनरच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने मायदेशात श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-२० मालिका जिंकली आहे.
या तीन वेगवान गोलंदाजांना मिळाले स्थान –
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंड क्रिकेट संघाबद्दल बोलायचे तर, मिचेल सँटनर हे संघाचे नेतृत्व करणार आहे, तर वेगवान गोलंदाज म्हणून विल्यम ओ’रोर्क, बेन सियर्स आणि नॅथन स्मिथ यांना स्थान मिळाले आहे. हे तिन्ही खेळाडू पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. याशिवाय मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन यांचाही या संघात समावेश आहे. फिरकी गोलंदाजीत सँटनर व्यतिरिक्त किवी संघाकडे मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स आणि रचिन रवींद्र पर्याय असतील.
केन विल्यमसनचा अनुभव येणार कामी –
केन विल्यमसनबद्दल बोलायचे, तर तो २०१३ आणि २०१७ मध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंड संघाचा सदस्य होता, त्यामुळे त्याचा अनुभव किवी संघासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. याशिवाय टॉम लॅथम आणि मिचेल सँटनर यांचाही शेवटच्या खेळलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंड संघात समावेश होता. लॅथम आगामी स्पर्धेतही यष्टिरक्षकाची भूमिका बजावेल. याशिवाय त्याच्याकडे फलंदाजीत मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, डॅरिल मिशेल सारखे तगडे खेळाडू आहेत. किवी संघ आपला पहिला गट सामना यजमान पाकिस्तानविरुद्ध १९ फेब्रुवारी रोजी खेळणार आहे. त्याचबरोबर दुसरा सामना २४ फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध खेळावा खेळेल. त्यानंतर शेवटच्या गट सामन्यात २ मार्च रोजी न्यूझीलंडचा सामना बलाढ्य भारताविरुद्ध होणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी न्यूझीलंडचा १५ सदस्यीय संघ :
मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, विल ओ’रुर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, बेन सियर्स, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन आणि विल यंग.