New Zealand Beat India After 35 Years on Indian Soil: न्यूझीलंड संघाने ३५ वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकत इतिहास घडवला आहे. न्यूझीलंडने भारताचा पहिल्या कसोटीत ८ विकेट्सने पराभव केला आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात ४६ धावांवर सर्वबाद झाला, याचा भारताला चांगलाच फटका बसला. न्यूझीलंडने प्रत्युत्तरात ४०२ धावा केल्या आणि भारतावर ३५६ धावांची आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारताने चांगले पुनरागमन करत ही मोठी आघाडी खोडून ४६२ धावा केल्या आणि विजयासाठी १०७ धावांचे लक्ष्य न्यूझीलंड संघाला दिले आणि न्यूझीलंडने ८ विकेट्स आणि २७.४ षटकांत भारतावर ऐतिहासिक विजय मिळवला.
न्यूझीलंड संघाने भारताने दिलेल्या १०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टॉम लॅथम खाते न उघडताच बाद झाला. यानंतर डेव्हॉन कॉन्वे १७ धावा करत बाद झाला. पण यानंतर विल यंग आणि रचिन रवींद्र यांनी नाबाद राहत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. विल यंगने ६ चौकार आणिएका षटकारासह ४८ धावा केल्या. तर शतकवीर रचिन रवींद्रने ६ चौकारांसह ३९ धावा करत संघाचा विजय निश्चित केला. भारताकडून फक्त जसप्रीत बुमराहला दोन विकेट्स घेण्यात यश मिळाले.
पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ढगाळ वातावरणात, न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी दहशत निर्माण केली आणि भारताला त्यांच्या सर्वात कमी धावसंख्येवर म्हणजे फक्त ४६ धावांवर बाद केले. भारताचे पाच फलंदाज शून्यावर बाद झाले. अशारितीने भारताने घरच्या मैदानावर सर्वात कमी धावसंख्या नोंदवली.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडने पहिल्या डावात ४०२ धावा केल्या आणि भारतावर ३५६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. दुसऱ्या डावात भारतीय संघ पलटवार करणार असे वाटत असताना मॅट हेन्री आणि विल्यम ओरूक यांनी प्रत्येकी तीन विकेट घेत सामन्याचा मार्गच बदलून टाकला.
वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात तीन विकेट्स घेतल्या, तर विल्यम ओरूकने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात तीन भारतीय फलंदाजांना बाद केले. भारतीय वंशाच्या रचिन रवींद्रने पहिल्या डावात १३२ धावा करत कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक झळकावले आणि न्यूझीलंडला ३५६ धावांची आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दुस-या डावातही तो नाबाद राहिला आणि धावफलकावर सतत धावा करत संघाचा विजय निश्चित केला.
भारताच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात कमाल करत चांगले पुनरागमन केले. भारताकडून टॉप-५ फलंदाजांनी अर्धशतक झळकावले. यशस्वी जैस्वालने ३५, रोहित शर्माने ५२, विराट कोहली ७०, ऋषभ पंत ९९ तर सर्फराझ खानने १५० धावांची उत्कृष्ट खेळी करत ३५६ धावांची आघाडी खोडून काढली. पण यानंतर नवीन चेंडू घेतल्यानंतर भारताच्या फलंदाजांनी आपले विकेट्स टाकले. हेन्री आणि ओरूकने प्रत्येकी ३ विकेट घेतले तर एजाज पटेल, टीम साऊदी आणि फिलिप्सने प्रत्येकी १ विकेट घेतली.