भारतीय पुरुष हॉकी संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ०-२ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने १-० अशी आघाडी घेतली आहे.

चुरशीने झालेल्या सामन्यात निक हेगने पाचव्या मिनिटाला न्यूझीलंडचे खाते उघडले. जेरॉड पांचियाने २७व्या मिनिटाला आणखी एक गोल करीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

या सामन्याच्या प्रारंभापासूनच दोन्ही संघांनी आक्रमक चालींवर भर दिला होता. पाचव्या मिनिटाला न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत हेग याने संघाचे खाते उघडले. हा गोल झाल्यानंतर कोणतेही दडपण न घेता भारतीय खेळाडूंनी चांगल्या चाली केल्या. विशेषत: निक्कीन थिमय्याने उजव्या बाजूने जोरदार आक्रमण केले. मात्र न्यूझीलंडच्या बचाव फळीतील खेळाडूंनी हे हल्ले रोखून धरले. १७व्या मिनिटाला भारताला गोल करण्याची संधी लाभली होती,

मात्र आकाशदीपसिंग याने दिलेल्या पासवर रमणदीपसिंग याला गोल नोंदविता आला नाही. दरम्यान, न्यूझीलंडच्या खेळाडूंनीही चांगली व्यूहरचना करीत आक्रमण केले. २७व्या मिनिटाला जेरॉडने अप्रतिम गोल करीत न्यूझीलंडची बाजू भक्कम केली.

उत्तरार्धात भारतीय संघाने चाली केल्या, मात्र त्यांच्या चालीत अपेक्षेइतकी भेदकता नव्हती. तसेच त्यांच्या चालीत समन्वयाचाही अभाव होता. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी बचावात्मक खेळावर भर देत भारतीय खेळाडूंना यश मिळवण्यापासून वंचित ठेवले. या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी होणार आहे.