New Zealand beat Pakistan by 5 wickets to win the tri series 2025 : न्यूझीलंडने तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करत जेतेपद पटकावले. किवी संघाने २८ चेंडू शिल्लक असताना हा सामना जिंकला आहे. या विजयामुळे २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी न्यूझीलंड संघाचे मनोबल वाढेल. डॅरिल मिशेल आणि टॉम लॅथम या दोघांनीही अर्धशतके झळकावून न्यूझीलंडला अंतिम सामना जिंकण्यास मदत केली. संपूर्ण मालिकेत एकही सामना न गमावता न्यूझीलंडने ट्रॉफीवर कब्जा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कराचीच्या राष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना २४२ धावा केल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अगदी आधी, दबावाने भरलेल्या सामन्यात पाकिस्तान संघाचा कोणताही खेळाडू अर्धशतकही झळकावू शकला नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. कर्णधार मोहम्मद रिझवान व्यतिरिक्त सलमान आघाने पुन्हा एकदा पाकिस्तान संघाची लाज राखण्याचा प्रयत्न केला. रिझवान आणि सलमान यांनी अनुक्रमे ४६ आणि ४५ धावा केल्या. तैय्यब ताहिरनेही ३८ धावांचे योगदान देत पाकिस्तानला २४२ धावांपर्यंत पोहोचवले.

न्यूझीलंडने अंतिम सामन्यात मारली बाजी –

पाकिस्तानच्या २४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. कारण विल यंग फक्त ३ धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर, डेव्हॉन कॉनवे आणि केन विल्यमसन यांनी ७१ धावांची महत्त्वाची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. यानंतर विल्यमसन ३४ धावांवर बाद झाला, तर कॉनवेही त्याच्या नंतर ४८ धावांवर बाद झाला. यानंतर डॅरिल मिशेल संघाची धुरा सांभाळली. त्याने मधल्या षटकांमध्ये ५७ धावा काढून न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.

मिशेल-लॅथमच्या भागीदारीने बजावली महत्त्वाची भूमिका –

टॉम लॅथमचा खेळी ५६ धावांत संपुष्टात आली असली, तरी त्याने संघाचा विजय जवळजवळ निश्चित केला होता. या सामन्यात न्यूझीलंडच्या विजयात डॅरिल मिशेल आणि टॉम लॅथम यांच्यातील ८७ धावांच्या भागीदारीने महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तान संघाबद्दल बोलायचे झाले तर, बाबर आझम एकदा अपयशी ठरला आणि २९ धावा करून बाद झाला. त्याच वेळी, शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीत तीक्ष्णतेचा अभाव होता, ज्याने ९ षटकांत ४५ धावा देऊन फक्त एकच बळी घेतला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New zealand beat pakistan by 5 wickets to win the tri series 2025 william orourke take 4 wickets vbm