विजयासाठी मिळालेले १०५ धावांचे छोटेसे लक्ष्य झटपट पूर्ण करीत न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आठ विकेट्सने दणदणीत विजय मिळवीत वर्षांचा शेवट गोड केला.
ब्रेंडन मॅक्क्युलमच्या १३४ चेंडूतील १९५ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने ४४१ धावांची मजल मारली. जेम्स नीशामने ८० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह ८५ धावांची खेळी केली. श्रीलंकेतर्फे अँजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक ३ बळी घेतले. न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेची पहिल्या डावात घसरगुंडी उडाली आणि त्यांचा डाव १३८ धावांतच आटोपला. अँजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक ५० धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे नील व्ॉगनरने ३ बळी घेतले.
न्यूझीलंडने श्रीलंकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. फॉलोऑनची नामुष्की ओढवलेल्या श्रीलंकेने दुसऱ्या डावात चिवट फलंदाजी करीत डावाचा पराभव टाळला. दिमुथ करुणारत्नेने ४८३ मिनिटे खेळपट्टीवर नांगर टाकत १७ चौकारांसह १५२ धावांची खेळी साकारली. अँजेलो मॅथ्यूजने ६६ धावा करीत त्याला चांगली साथ दिली. श्रीलंकेने दुसऱ्या डावात ४०७ धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी यांनी प्रत्येकी ४ बळी घेतले. विजयासाठी मिळालेले १०५ धावांचे आव्हान न्यूझीलंडने २ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. केन विल्यमसनने ३१ धावा केल्या. विक्रमी शतक झळकावणाऱ्या मॅक्क्युलमला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.