आशियाई खेळपट्टीवर आम्हीही विजयी झेप घेऊ शकतो, हे न्यूझीलंडने सराव सामन्यात श्रीलंकेवर ७४ धावांनी सहज विजय मिळवून दाखवून दिले.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि मार्टिन गप्तीलने २५ चेंडूंत ७ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४१ धावांची खेळी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. गप्तील बाद झाल्यावर कॉलिन मुन्रोचा झंझावात पाहायला मिळाला. दहाव्या षटकाच्या पहिल्या चार चेंडूवर त्याने षटकार लगावले, त्यानंतर २१व्या चेंडूंवरही षटकार खेचत त्याने अर्धशतक पूर्ण केले. मुन्रोने ३४ चेंडूंत ७ षटकारांच्या जोरावर ६७ धावा केल्या. कोरे अँडरसननेही धुवाँधार फलंदाजी करत २९ चेंडूंत ४ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ६७ धावांची खेळी साकारली. दुखापतीमुळे तो तंबूत परतला.

विजयी आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात आश्वासक झाली नाही. श्रीलंकेच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी साकारता न आल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड : २० षटकांत ५ बाद २२६ (कोरे अँडरसन जखमी बाद ६७, कॉलिन मुन्रो ६०; दासून शनाका २/४८) विजयी वि. श्रीलंका : २० षटकांत ७ बाद १५२ (लाहिरू थिरीमाने ४१; अ‍ॅडम मिल्ने २/२६).

Story img Loader