India Women’s Team Scenario for T20 World Cup 2024 Semifinal: महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या प्रत्येक गट सामन्यानंतर उपांत्य फेरीचे गणित अधिक रोमांचक होत आहे. स्पर्धेतील १५वा सामना शारजाह येथे खेळला गेला, ज्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव केला आणि उपांत्य फेरीच्या दिशेने दमदार पाऊल टाकले. या नेत्रदीपक विजयानंतर, न्यूझीलंड अजूनही अ गटात तिसऱ्या स्थानावर आहे, परंतु संघाने नेट रन रेटमध्ये कमालीची सुधारणा केली आहे. भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाला आता गट सामन्यातील शेवटचा सामना जबरदस्त फॉर्मात असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने २० षटकांत ५ गडी गमावून ११५ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने जॉर्जिया प्लिमरच्या अर्धशतकाच्या जोरावर केवळ १७.३ षटकांत ८ गडी गमावून ११६ धावांचे लक्ष्य गाठले. या शानदार विजयासह, न्यूझीलंडने आपला नेट रन रेट -0.050 वरून +0.282 पर्यंत वाढवला आहे. त्याच वेळी, टीम इंडियाचा नेट रन रेट +0.576 आहे.

हेही वाचा – Rishabh Pant: “शक्य तितका वेळ काढ…”, ऋषभ पंतचा टी-२० वर्ल्डकप फायनलमधील खोट्या दुखापतीबाबत खुलासा, फिजिओला पाहा काय म्हणाला होता?

भारत आणि न्यूझीलंड या दोघांचे आता प्रत्येकी ४ गुण आहेत, परंतु चांगल्या नेट रनरेटमुळे टीम इंडिया ग्रुप-ए मध्ये अव्वल क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड तिसऱ्या तर पाकिस्तानचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी सलग चौथा सामना गमावून श्रीलंका उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडली आहे.

हेही वाचा – Hardik Pandya: “अखेर मला असा कोणीतरी भेटला…”, म्हणत ‘या’ भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीने शेअर केले हार्दिक पंड्याबरोबरचे फोटो

टी-२० विश्वचषक सेमीफायनलची शर्यत रोमांचक वळणावर

सलग ३ सामने जिंकून अ गटात ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. आता ऑस्ट्रेलियाचा शेवटचा सामना भारताशी होणार आहे. टीम इंडियाला उपांत्य फेरीत जायचे असेल तर ऑस्ट्रेलियाला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागेल. तसेच न्यूझीलंडच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. न्यूझीलंडचा ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. किवी संघाचा उत्कृष्ट फॉर्म पाहता न्यूझीलंडची पाकिस्तानविरूद्ध विजयाची शक्यता जास्त आहे. भारताने शेवटचा गट सामना गमावला तर उपांत्य फेरीचे दरवाजे त्याच्यासाठी बंद होतील आणि न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानला हरवून उपांत्य फेरीत पोहोचेल.