Pakistan defeated New Zealand by 21 runs using Duckworth Lewis rule: शनिवारी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील ३५वा सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ४०१ धावा केल्या होत्या. त्यावेळी हा सामना पाकिस्तानचा संघ जिंकेल असे कुणालाही वाटले नव्हते. मात्र पावसाने व्यत्यय आणल्याने पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमानुसार किवी संघाचा २१ धावांनी पराभव केला. विश्वचषकाच्या ४८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच ४०० धावा करून संघ पराभूत झाला आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ६ गडी बाद ४०१ धावा केल्या. रचिन रवींद्रने १०८ धावांची उत्कृष्ट खेळी केली. तर कर्णधार विल्यमसनने ९५ धावांचे योगदान दिले. फिलिप्सने ४१ धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनियरने तीन बळी घेतले. हसन अली, इफ्तिखार अहमद आणि हारिस रौफ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानचा डाव पावसामुळे दोनदा थांबविण्यात आला. पावसामुळे जे्वहा दुसऱ्यांदा खेळ थांबला तोपर्यंत पाकिस्तानने २५.३ षटकात एका विकेटवर २०० धावा केल्या होत्या. डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानचा संघ २१ धावांनी पुढे होता. अशाप्रकारे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
पाकिस्तानकडून फखर जमानने ८१ चेंडूत नाबाद १२६ धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार बाबरने ६३ चेंडूत ६६ धावांची नाबाद खेळी केली. २५.३ षटकांत पाकिस्तानची धावसंख्या १ बाद २०० धावा होती. यानंतर पावसामुळे खेळ होऊ शकला नाही आणि पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमानुसार २१ धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने एक विकेट घेतली.
विश्वचषकाच्या इतिहासाबद्दल बोलायचे, तर याआधी ५ वेळा ४०० हून अधिक धावा झाल्या आणि प्रत्येक वेळी प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला. २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्ध ४२८ धावा केल्या होत्या. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध ४१७ धावा केल्या होत्या, २००७ मध्ये भारताने बर्म्युडाविरुद्ध ४१३, दक्षिण आफ्रिकेने नेदरलँडविरुद्ध ४११ आणि वेस्ट इंडिजविरुद्ध ४०८ धावा केल्या होत्या. विश्वचषकाच्या इतिहासात दुसऱ्या डावात कधीही ४०० धावा झाल्या नाहीत. ११ नोव्हेंबरला विश्वचषकात पाकिस्तानचा शेवटचा सामना इंग्लंडशी होणार आहे. निव्वळ धावगती सुधारण्यासाठी बाबर आझमच्या संघाला हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. न्यूझीलंड संघ ९ नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे.