न्यूझीलंडचा माजी अनुभवी क्रिकेटपटू ख्रिस केर्न्स काही काळापासून हृदयरोगाशी झुंज देत होता आणि त्याला लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते. पण आता केर्न्सबद्दल चांगली बातमी समोर आली आहे. तो हळूहळू बरा होत असून त्याच्यावर ऑस्ट्रेलियात उपचार सुरू आहेत. ५१ वर्षीय ख्रिस केर्न्सवर मॅच फिक्सिंगचा आरोप होता आणि त्यानंतर त्याला बऱ्याच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले.
क्रिकइन्फोच्या बातमीनुसार, ख्रिस केर्न्सची लाईफ सपोर्ट सिस्टीम काढून टाकण्यात आली आहे. त्याचे वकील अॅरॉन लॉयड म्हणाले, ”केर्न्स लाइफ सपोर्ट सिस्टीमच्या बाहेर आला आहे. तो त्याच्या कुटुंबाशी बोलू शकतो.” केर्न्स गेल्या काही वर्षांपासून पत्नी आणि मुलांसोबत कॅनबेरा येथे राहत आहे.
ख्रिसच्या हृदयातील मुख्य धमणीला इजा झाली असल्याची माहिती समोर आली होती. या अशा समस्येला वैद्यकीय भाषेमध्ये अॅरोटीक डायसेक्शन असे म्हणतात. न्यूझीलंड क्रिकेट मंडळानेही ख्रिसच्या खासगी आयुष्यासंदर्भात आम्ही कोणतेही भाष्य करणार नसल्याचे म्हटले आहे.
ख्रिसची कारकीर्द
ख्रिसने न्यूझीलंडकडून ६२ कसोटी आणि २१५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच तो देशासाठी दोन टी-२० सामनेही खेळला आहे. १९८९ ते २००६ दरम्यान त्याने न्यूझीलंडकडून अष्टपैलू खेळाडू म्हणून समाधानकारक कामगिरी केली. नंतर तो समाचोलक म्हणून काम करायचा. आपल्या कालावधीमध्ये ख्रिस हा सर्वोच्च अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होता. विशेष म्हणजे त्याचे वडील लान्स हे सुद्धा न्यूझीलंडसाठी क्रिकेट खेळले आहेत.
मॅच फिक्सिंगचा आरोप
२००८ साली भारतात खेळवण्यात आलेल्या इंडियन क्रिकेट लीगमध्ये चंढीगड लायन्स संघाकडून खेळताना मॅच फिक्सिंग केल्याचे आरोप त्याच्यावर लावण्यात आले. मात्र त्याने हे सर्व आरोप फेटाळले. त्याने यासंदर्भात कायदेशीर लढाईही लढली आहे.
हेही वाचा – अँडरसन-बुमराहमध्ये नक्की झालं काय?, कोचनं सांगितलं टीम इंडियाच्या पेटून उठण्याचं कारण
२०१४ मध्ये साफसफाई कामगार म्हणून चर्चेत
२००८ नंतर ख्रिस २०१४ रोजी चर्चेत आला होता. उदरनिर्वाहासाठी आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी ख्रिस केर्न्सला बस डेपोंची साफसफाईचे काम करावे लागत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मॅच फिक्सिंगच्या आरोपांवरुन ब्रिटीश अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केल्यानंतर ख्रिसच्या मागे न्यायालयीन चौकशी ससेमिरा सुरु झाला. न्यायालयीन लढाईचा खर्च, गोठवलेली बँक खाती यामुळे दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठीही ख्रिसला साफसफाई कामगार म्हणून काम करावं लागले. तो ऑकलंड कौन्सिलमध्ये बस डेपोच्या साफसफाईचे काम करायच्या ज्यासाठी त्याला ताशी १७ डॉलर पगार मिळत असे.