विश्वचषकाच्या इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास किवी संघाची धाव ही उपांत्य फेरीच्या कुंपणापर्यंतच  मर्यादित राहिल्याचे सहज अधोरेखित होते. आतापर्यंतच्या दहा विश्वचषकांपैकी सहा वेळा न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला, परंतु हा अडथळा ओलांडण्याचे मनोधैर्य त्यांना अद्याप दाखवता आलेले नाही. त्यामुळे जगज्जेते होण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी कधीही आले नाही. यंदा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकामध्ये १९९२च्या कामगिरीची पुनरावृत्ती करून उपांत्य फेरीचा अडसर ओलांडण्याचा निर्धार न्यूझीलंड संघाने केला आहे.
१९७५च्या पहिल्या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात कर्णधार ग्लेन टर्नरने ईस्ट आफ्रिकेविरुद्ध नाबाद १७१ धावांची शानदार खेळी साकारून न्यूझीलंडला १८१ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला होता. गटउपविजेता म्हणून न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला, परंतु न्यूझीलंडविरुद्ध हा संघ फारसा प्रतिकार न करताच हरला. १९७९मध्ये एम. जी. बर्गेसच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने पुन्हा उपांत्य फेरी गाठली, या वेळी इंग्लिश संघाने फक्त ९ धावांनी त्यांचा पराभव केला. जेफ होवार्थच्या नेतृत्वाखाली १९८३मध्ये न्यूझीलंड संघाने घोर निराशा केली. गटसाखळीमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या खात्यावर समान १२ गुण होते; परंतु सरस धावगतीच्या बळावर किवी संघ दुसरी फेरी गाठण्यात अपयशस्वी ठरला. १९८७मध्ये न्यूझीलंडची कामगिरी अतिशय सामान्य दर्जाची झाली. जेफ क्रोच्या नेतृत्वाखालील या संघाला साखळीचा अडसरही ओलांडता आला नाही. दुबळ्या झिम्बाब्वेविरुद्धचे दोन विजय वगळता भारत आणि ऑस्ट्रेलियाकडून या संघाने सपाटून मार खाल्ला.
१९९२मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड भूमीवर झालेल्या विश्वचषकात न्यूझीलंडचा अश्वमेध यशस्वीपणे घोडदौड करीत होता. फक्त पाकिस्तान या एकाच संघामध्ये त्यांना अडवण्याची हिंमत होती, अन्यथा किवी संघाचे जगज्जेतेपदाचे स्वप्न साकारले असते. राऊंड रॉबिन पद्धतीने झालेल्या साखळी सामन्यात न्यूझीलंडने आठपैकी सात सामने जिंकण्याची किमया साधत उपांत्य फेरी गाठली. परंतु साखळीतल्या पराभवाप्रमाणेच उपांत्य फेरीत पाकिस्तानने त्यांना नामोहरम केले. त्या वेळी मार्टिन क्रो न्यूझीलंडचा कप्तान होता. अनेक आश्चर्यकारक कल्पना त्याने मैदानावर अमलात आणल्या. कधी फिरकीपटू दीपक पटेलला पहिले षटक दिले, तर कधी मार्क ग्रॅटबॅचला सलामीला पाठवून प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या योजना हाणून पाडल्या.
१९९६मध्ये ली जर्मनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने सलामीलाच इंग्लंडला ११ धावांनी हरवून विश्वचषकाचा प्रारंभ उत्तम केला. परंतु दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानकडून त्यांनी हार पत्करली. उपांत्यपूर्व फेरीत परंपरागत प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंडने २८६ धावांचा डोंगर उभारला, मात्र तरीही त्यांना कांगारूंनी सहा विकेट राखून हरवले. अष्टपैलू ख्रिस हॅरिसने चेन्नईत साकारलेली १३० धावांची खेळी आजही विश्वचषकाच्या इतिहासात संस्मरणीय खेळी मानली जाते. १९९९मध्ये स्टीफन फ्लेमिंगच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला हरवून पराभवाची परतफेड केली. मग सुपर सिक्समध्ये न्यूझीलंडने भारताला पराभवाचा धक्का दिला, तर पावसामुळे झिम्बाब्वेविरुद्धचा सामना रद्द झाल्यामुळे गुणांचे विभाजन पदरी पडले. सात वर्षांनी उपांत्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या न्यूझीलंडच्या स्वप्नापुढे पुन्हा पाकिस्तानने पूर्णविराम दिला. २००३च्या विश्वचषकासाठी कर्णधारपदाची धुरा पुन्हा फ्लेमिंगकडे सोपवण्यात आली; परंतु श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेने त्यांना पराभूत केले. मग न्यूझीलंडने वेस्ट इंडिज, यजमान दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि कॅनडाला नामोहरम करीत सुपर सिक्समध्ये झोकात स्थान मिळवले. परंतु झिम्बाब्वेविरुद्ध एकमेव विजय मिळवू शकणाऱ्या किवी संघाला गुणतालिकेत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. विश्वचषकाचा यशस्वी संघनायक म्हणून बिरुद मिरवणाऱ्या फ्लेमिंगने २००७मध्ये तिसऱ्यांदा न्यूझीलंडचे कर्णधारपद सांभाळले. परंतु या वेळी मात्र त्याने संघाला उपांत्य फेरीपर्यंत नेले. इंग्लंड, केनिया, कॅनडाला पराभूत करून न्यूझीलंड संघ गटविजेत्याच्या आविर्भावात बाद फेरीमध्ये पोहोचला. सुपर एटमध्ये न्यूझीलंडने चार सामने जिंकले आणि ऑस्ट्रेलिया, श्रीलंकेकडून हार पत्करली. मग उपांत्य फेरीत श्रीलंकेने ७९ धावांनी हरवून किवी संघाची घोडदौड रोखली.
२०११च्या विश्वचषकात न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध ११० धावांनी महत्त्वपूर्ण विजयाची नोंद केली. कप्तान डॅनियल व्हेटोरीच्या संघाने साखळीत चार विजय आणि दोन पराभवांसह उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारतीय उपखंडातील कामगिरीमध्ये सुधारणा करीत न्यूझीलंडने ढाका येथे दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाला ४९ धावांनी हरवण्याचे कर्तृत्व दाखवले. पण पुन्हा श्रीलंकेने उपांत्य फेरीत त्यांची वाटचाल रोखली. २०११मध्ये मायदेशातील क्रिकेटरसिकांच्या अपेक्षांचे ओझे सांभाळत भारताने विश्वविजेतेपद जिंकले होते. भारताच्या पावलांवर पाऊल टाकत, हेच यश किवी संघ यंदा मिळवेल, अशी आशा बाळगता
येईल.                                                

बलस्थाने आणि कच्चे दुवे
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडचे नेतृत्व अनुभवी आणि स्फोटक फलंदाज ब्रेंडन मॅक्क्युलम सांभाळत आहे. याशिवाय मार्टिन गप्तील, रॉस टेलर आणि केन विल्यम्सन यांच्यासारख्या फलंदाजांमुळे त्यांची फलंदाजीची फळी मजबूत झाली आहे. याशिवाय कोरे अँडरसन आणि ग्रँट एलियट हे दोन अव्वल दर्जाचे अष्टपैलू खेळाडू या संघात आहेत. जादूई फिरकी गोलंदाज डॅनियल व्हेटोरीचा अनुभव आणि नॅथन मॅक्क्युलमची फिरकी संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. अनुभवी आणि युवा खेळाडू यांचा समतोल या संघात साधण्यात आला आहे. न्यूझीलंड संघाला साखळीतील सर्व सामने, उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामने घरच्या मैदानावर खेळता येणार आहेत. याचा फायदा त्यांना घेता येऊ शकेल. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील खेळपट्टय़ांसाठी अनुकूल गोलंदाजीची फळी किवी संघाकडे आहे. किवी भूमीवर १९९२मध्ये हुकलेले जग जिंकण्याचे स्वप्न ते यंदा साकारतील, असे क्रिकेटमधील जाणकारांचे म्हणणे आहे.

अपेक्षित कामगिरी
न्यूझीलंड संघाने विश्वचषकातील ७० सामन्यांपैकी ४० सामने जिंकले आहेत, तर २९ सामन्यांत पराभव पत्करले आहेत. त्यामुळे विजयाची ५७.९७ टक्केवारी न्यूझीलंडच्या खात्यावर आहे. ‘अ’ गटातून न्यूझीलंड संघाला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्यानंतर घरच्या मैदानावरील अनुकूलतेचा फायदा घेऊन न्यूझीलंडला सातव्यांदा उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचता येईल.  

शब्दांकन :  प्रशांत केणी

Story img Loader