न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडर आता उपचाराला चांगला प्रतिसाद देऊ लागला आहे. त्यामुळे क्रिकेटक्षेत्राला आणि त्याच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. रायडरला प्राणघातक मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन हल्लेखोरांना अटक केली आहे.
ख्राइस्टचर्चमधील एका बारबाहेर गुरुवारी पहाटे रायडरवर एका गटाने दोनदा हल्ला केला. त्यानंतर चिंताजनक स्थितीमध्ये रायडरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. कवटीला इजा झाल्यामुळे तो अतिदक्षता विभागात कोमामध्ये होता. तो आयुष्याशी झुंजत असताना न्यूझीलंडच्या क्रिकेटप्रमाणेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तो बरा व्हावा, यासाठी करुणा भाकली जात होती. त्याचे व्यवस्थापक आरोन क्ली म्हणाले की, ‘‘शुक्रवारी जेसीने उपचाराला प्रतिसाद दिला. त्यामुळे त्याचे प्राण वाचावे यासाठी मेहनत घेणारे वैद्यकीय कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबीयातील सदस्य यांना दिलासा मिळाला आहे.’’
रायडरला अद्याप अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून, त्याची प्रकृती मात्र स्थिर आहे. फुप्फुसाला दुखापत झाल्यामुळे त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले आहे. त्याच्या डोक्याला झालेल्या दुखापतीचे स्वरूप अजूनही स्पष्ट झालेले नाही.
त्याची आई हिदर आणि पत्नी अॅली यांनी जेसी बरा व्हावा म्हणून जगभरातून सहानुभूती प्रकट करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले. याचप्रमाणे कायदा हातात घेऊन जेसीला मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांना तुरुंगात टाकणाऱ्या पोलिसांचे या दोघींनी आभार मानले.
‘‘आम्ही गेले २४ तास जेसीच्या प्रकृतीसाठी आलेले संदेश वाचत आहोत. तो जेव्हा बरा होईल, तेव्हा त्याला वाचण्यासाठी ते आम्ही ठेवले आहेत,’’ असे त्याच्या कुटुंबीयांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी एका २० वर्षांच्या इसमाला आणि त्याच्या ३७ वर्षीय नातेवाईकाला हल्ल्याप्रकरणी अटक केली असून, पुढील गुरुवारी या दोघांना न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. मद्यपानासंदर्भात अनेक प्रकरणांत रायडर आतापर्यंत सापडलेला आहे. या हल्ल्याआधीसुद्धा त्याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु या प्रकरणात मद्य हा घटक महत्त्वाचा नाही, असे पोलिसांनी सांगितले.
रायडरच्या प्रकृतीत सुधारणादोन हल्लेखोरांना अटक
न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडर आता उपचाराला चांगला प्रतिसाद देऊ लागला आहे. त्यामुळे क्रिकेटक्षेत्राला आणि त्याच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. रायडरला प्राणघातक मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन हल्लेखोरांना अटक केली आहे.
First published on: 30-03-2013 at 05:49 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New zealand cricketer jesse ryders condition improving