Doug Bracewell Cocaine Tests Positive : न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज डग ब्रेसवेलवर एका महिन्याची बंदी घालण्यात आली आहे. कोकेन सेवन केल्याप्रकरणी चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळला आहे. खरं तर, या वर्षी जानेवारीमध्ये, ब्रेसवेलने देशांतर्गत टी-२० सामन्यात सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सकडून खेळताना वेलिंग्टनविरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. त्या सामन्यानंतर ब्रेसवेलने ड्रग्ज सेवन केले होते. याबाबत, स्पोर्ट्स इंटिग्रिटी कमिशनने पुष्टी केली आहे की या ३४ वर्षीय वेगवान गोलंदाजाने खरोखरच कोकेनचे सेवन केले होते.
डग ब्रेसवेलवर एका महिन्याची बंदी –
स्पोर्ट्स इंटिग्रिटी कमिशनला त्यांच्या तपासणीत असे आढळून आले की, डग ब्रेसवेलने कोकेनचे सेवन केले होते, परंतु त्याचा त्याच्या क्रिकेट कामगिरीशी काहीही संबंध नव्हता. आम्ही तुम्हाला आठवण करून देतो की, वेलिंग्टनविरुद्धच्या त्या सामन्यात ब्रेसवेलने २१ धावांत २ बळी घेतले होते आणि ११ चेंडूत ३० धावांची तुफानी खेळी खेळून आपल्या संघाला ६ गडी राखून विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. दोषी आढळल्यानंतर, ब्रेसवेलवर सुरुवातीला तीन महिन्यांची बंदी घालण्यात आली होती, जी नंतर एक महिन्यावर कमी करण्यात आली. कारण त्याने सुधारक केंद्रात एक महिना घालवला होता.
न्यूझीलंड क्रिकेटच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी डग ब्रेसवेलच्या कृतीबद्दल निराशा व्यक्त केली, पण तरीही बोर्ड त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला पाठिंबा देईल. ब्रेसवेलने आपली चूक मान्य केली आहे. डग ब्रेसवेलची कारकीर्द मैदानाबाहेर वादग्रस्त घटनांनी भरलेली आहे. वयाच्या १८व्या वर्षापासून त्याला अशा घटनांनी घेरले आहे. दारूच्या नशेत गाडी चालवताना त्याला अनेकवेळा पकडण्यात आले आहे. २०१० ते २०१७ पर्यंत अशा घटनांमुळे तो अनेकवेळा चर्चेत आला होता.
सचिन, सेहवाग, रोहितसारख्या दिग्गजांची घेतलीय विकेट –
न्यूझीलंडच्या या दिग्गज वेगवान अष्टपैलू खेळाडूने भारतातील अनेक दिग्गजांची विकेट घेण्यात यश मिळवले आहे. ब्रेसवेलने टीम इंडियाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि माजी कर्णधार रोहित शर्मासारख्या फलंदाजांना बाद केले आहे. ब्रेसवेलने सलामीवीर फलंदाज रोहित शर्माविरुद्ध आतापर्यंत ४ डावांत गोलंदाजी केली असून, त्यात त्याने दोनदा रोहितला बाद केले आहे. तसेच, त्याने ३ डावांपैकी २ वेळा सेहवागला बाद केले. याशिवाय भारताचा दिग्गज फलंदाज सचिनला एकदा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवण्यातही ब्रेसवेल यशस्वी ठरला होता.
डग ब्रेसवेलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –
डग ब्रेसवेलने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत न्यूझीलंडकडून २८ कसोटी सामन्यांमध्ये ७४ विकेट्स घेण्यासोबतच ५६८ धावा केल्या. त्याच्या नावावर २१ एकदिवसीय सामन्यांमध्ये २६ विकेट्स आणि २२१ धावा आहेत आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने अर्धशतकही झळकावले आहे. त्याने २० टी-२० सामन्यात २० विकेट्स घेतल्या आहेत.