न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीयांच्या आशा अखेर आज संपुष्ठात आलेल्या आहेत. एच.एस.प्रणॉय आणि सौरभ वर्मा यांना आपल्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. चीन तैपेईच्या लिन यू हेसिनने प्रणॉयचा १०-२१, २२-२०, २१-२३ असा पराभव केला. एक तास सहा मिनीट चाललेल्या या सामन्यात प्रणॉयने लिनला चांगली लढत दिली मात्र सामन्यात त्याला विजय मिळवता आला नाही.
मागच्या महिन्यात अमेरिकन ओपन स्पर्धेचं प्रणॉयने विजेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे या स्पर्धेतही तो अशीच काहीशी कामगिरी करेलं अशी सर्वांची आशा होती. मात्र प्रणॉयच्या पराभवामुळे क्रीडारसिकांच्या आशा धुळीला मिळाल्या आहेत. प्रणॉय आणि त्याचा प्रतिस्पर्धी लिन यू यांच्यातला पहिला सेट एकतर्फी झाला. पहिल्या सेटमध्ये लिनने बाजी मारली, मात्र त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये चांगली लढत देत प्रणॉयने सामन्यात बरोबरी साधली. मात्र अखरेच्या सेटमध्ये आपला सर्व अनुभव पणाला लावत लिनने सामना आपल्या खिशात घातला.
सौरभ वर्माला आजच्या सामन्यात अवघ्या ४२ मिनीटांमध्ये गाशा गुंडाळावा लागला. हाँगकाँगच्या ली च्यूक ह्यूने सौरभवर सरळ दोन सेट्समध्ये १९-२१, १६-२१ अशी मात केली. सौरभने याआधीच्या सामन्यात भारताच्या परुपल्ली कश्यपवर मात केली होती.