Devon Conway has tested positive for Covid 19 : सध्या न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. पाकिस्तानविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर डेव्हॉन कॉनवेला कोरोनाची लागण झाली आहे. तो शुक्रवार, १९ जानेवारी रोजी क्राइस्टचर्च येथे होणारा सामना खेळणार नाही. यापूर्वी मिचेल सँटनरला कोरोना झाला होता. त्यामुळे तो पहिला टी-२० सामना खेळू शकला नव्हता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डेव्हॉन कॉनवेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (एनझेडसी) दिली. एनझेडसीने आपल्या निवेदनात म्हटले, “काल कोविड-१९ ची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर कॉनवे क्राइस्टचर्चमधील टीम हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये आहे. रविवारी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम टी-२० सामन्यापर्यंत तो निरीक्षणाखाली असेल.” बोर्डाने कळवले की कँटरबरी किंग्जचा फलंदाज चाड बोवेसचा कॉनवेचा बदली खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. गोलंदाजी प्रशिक्षक आंद्रे अॅडम्स यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

केन विल्यमसन आधीच मालिकेतून बाहेर –

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन दुसऱ्या सामन्यानंतर मालिकेतून बाहेर पडला आहे. विल्यमसनला दुसऱ्या टी-२० सामन्यात दुखापत झाली होती. दुखापत झाल्याने त्याला फलंदाजी अर्ध्यावर सोडून द्यावी लागली. त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. या अगोदर आयपीएल २०२३ मध्ये त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. त्याच्या जागी मिचेल सँटनर कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. तिसर्‍या टी-२० सामन्यात फिन ऍलनने उत्कृष्ट शतक झळकावले होते.

हेही वाचा – Team India : ‘हार्दिक-शिवम दोघांनाही टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळू शकते…’, माजी दिग्गजाचे मोठे विधान

न्यूझीलंड संघाने मालिका जिंकली –

न्यूझीलंड संघाने पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-० अशी जिंकली आहे. शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची ही पहिली टी-२० मालिका आहे. आता संघाला शेवटच्या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून क्लीन स्वीप टाळण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ नंतर बाबर आझमने सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर शान मसूदला टेस्टमध्ये तर शाहीनला टी-२० संघाचा कर्णधार नियुक्त करण्यात आले होते. पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New zealand opener devon conway has tested positive for covid 19 in nz vs pak vbm
Show comments