न्यूझीलंडविरुद्धची पराभवाची मालिका खंडित करण्यात पुन्हा अपयश
मिचेल सँटनर न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार
ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकारात न्यूझीलंडविरुद्धची पराभवाची मालिका खंडित करण्यात भारताला पुन्हा एकदा अपयश आले. काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलेल्या नागपूरच्या खेळपट्टीने पुन्हा आपले रंग दाखवले. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर किवी संघाला जेरबंद करण्याचे मनसुबे भारताने आखले होते. न्यूझीलंडला सव्वाशेच्या आसपास रोखल्यानंतर भारताला अर्धी लढाई जिंकल्यासारखे वाटत होते. परंतु भारताने रचलेल्या चक्रव्यूहात तेच अडकले. ट्वेन्टी-२० विश्वचषकातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ४७ धावांनी पराभव केला. मिचेल सँटनर न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने ट्रेंट बोल्ट, मिचेल मॅकलॅघन आणि टिम साऊदी या भरवशाचा वेगवान गोलंदाजांना विश्रांती दिली, तेव्हा सर्वानाच आश्चर्य वाटले. मात्र भारतीय संघ फिरकीच्या बळावर रणनीती आखणार, याची कल्पना आल्यावर न्यूझीलंडनेही फिरकी अस्त्र उपयोगात आणले. सँटनर (११ धावांत ४ बळी)़, इश सोधी (१८ धावांत ३ बळी) आणि नॅथन मॅक्क्युलम (१५ धावांत २ बळी) या फिरकी गोलंदाजांसमोर भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. प्रारंभीपासून भारताचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. कर्णधार महेंद्रसिंग धोनी (३०) आणि विराट कोहली (२३) वगळता अश्विनने १० धावा केल्या. बाकी भारताच्या एकाही फलंदाजाला दोन आकडी धावा करता आल्या नाहीत. धोनी आणि अश्विनने आठव्या विकेटसाठी सर्वाधिक ३० धावांची भागीदारी रचली. अखेरीस १८.१ षटकांत ७९ धावांत भारताचा डाव आटोपला.
त्याआधी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फिरकी गोलंदाजीला साहाय्यक ठरणाऱ्या जामठाच्या खेळपट्टीवर रविचंद्रन अश्विन वगळता सर्व गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. त्यामुळे न्यूझीलंडला २० षटकांत ७ बाद १२६ धावसंख्येपर्यंत रोखता आले. अश्विनने सर्वाधिक ३२ धावा दिल्या. खेळपट्टी आणि गोलंदाज या आव्हानांचा मुकाबला करण्यात किवी फलंदाज अपयशी ठरले. फक्त कोरे अँडरसनने १६व्या षटकापर्यंत जिद्दीने खेळत ४२ चेंडूंत ३४ धावा केल्या. यष्टीरक्षक ल्युक राँचीने ११ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकारासह नाबाद २१ धावा केल्या. न्यूझीलंडने अखेरच्या षटकात १५ धावा काढल्या. त्यामुळे त्यांना १२० धावसंख्येचा टप्पा ओलांडता आला.भारताकडून मध्यमगती गोलंदाज जसप्रीत बुमराह (१५ धावांत १ बळी) सर्वात यशस्वी ठरला. त्याने अँडरसनला तंबूची वाट दाखवली. तर रवींद्र जडेजा, सुरेश रैना यांनी प्रत्येकी एकेक बळी घेतला. आशिष नेहराने २० धावांत १ बळी घेतला. तर अश्विनने स्फोटक सलामीवीर मार्टिन गप्तील याला बाद करण्याची किमया साधली.
अश्विनच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकणारा गप्तील दुसऱ्या चेंडूवर मात्र पायचीत होऊन माघारी परतला. मग कॉलिन मुन्रोने त्यानंतर चौथ्या चेंडूवर अश्विनला षटकार खेचला. अश्विनने पहिल्या षटकात १३ धावा दिल्या. मग नेहराने दुसऱ्या षटकात मुन्रोला बाद केले. मिड-ऑफला हार्दिक पंडय़ाने त्याचा सुरेख झेल टिपला. अश्विनने पहिल्या तीन षटकांत २६ धावा दिल्या. धोनीने मग अश्विनऐवजी सुरेश रैनाकडे चेंडू दिला. या कामचलाऊ फिरकी गोलंदाजाने मग चक्क केन विल्यमसनला बाद केले. मग रैनाच्या १२व्या षटकात धावचीत झाला. १५व्या षटकाअखेरीस न्यूझीलंडची ४ बाद ८९ अशी स्थिती होती. त्यानंतर शेवटच्या पाच षटकांत किवी फलंदाजांनी ३७ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : २० षटकांत ७ बाद १२६ (कोरे अँडरसन ३४, ल्युक राँची नाबाद २१; सुरेश रैना १/१५, जसप्रीत बुमराह १/१५) पराभूत वि. भारत : १८.१ षटकांत सर्व बाद ७९ (महेंद्रसिंग धोनी ३०, विराट कोहली २३; मिचेल सँटनर ४/११, इश सोधी ३/१८ आणि नॅथन मॅक्क्युलम २/१५)
सामनावीर : मिचेल सँटनर.