पावसाच्या व्यत्ययामुळे न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील चौथा एकदिवसीय सामना रद्द झाला. हा सामना जिंकून श्रीलंकेला मालिकेत २-२ अशी बरोबरी करता आली असती, दुसरीकडे हा सामना जिंकून यजमान न्यूझीलंडला मालिका विजय साजरा करता आला असता, पण नऊ षटकांनंतर पावसाने जोरदार फलंदाजी केल्यामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला असला तरी त्यांच्या फलंदाजांना चांगली सुरुवात करता आली नाही. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी ठरावीक फरकाने धक्का देत न्यूझीलंडची ३ बाद ५३ अशी स्थिती केली होती. त्यानंतर रॉस टेलर (नाबाद २०) आणि हेन्री निकोल्स (नाबाद ४) यांनी संघाची पडझड थांबवली होती, पण नवव्या षटकात पावसाचे आगमन झाले आणि काही मिनिटांमध्ये सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्याच्या घडीला न्यूझीलंडकडे २-१ अशी आघाडी असून ते ही मालिका गमावणार नाही, हे निश्चित झाले आहे. दुसरीकडे श्रीलंकेला मालिका जिंकता येणार नसली तरी त्यांना बरोबरी करण्याची संधी अजूनही आहे. त्यामुळे पाचव्या आणि मालिकेतील अखेरच्या सामन्यावर साऱ्यांच्या नजरा असतील.