पीटीआय, वेलिंग्टन : दोन वर्षांनी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या तयारीला न्यूझीलंड दौऱ्यापासून सुरुवात होणार असून अनेक खेळाडूंना संघात स्थान मिळवण्यासाठी पुरेशी संधी देण्यात येईल, असे भारताचा कर्णधार हार्दिक पंडय़ा म्हणाला. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात दहा गडी राखून पराभूत व्हावे लागले. परंतु, न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत संघाला चांगली कामगिरी करायची आहे, असे पंडय़ा म्हणाला.
‘‘विश्वचषकातील कामगिरीमुळे आम्ही निराश आहोत, मात्र यामधून आम्हाला सावरावे लागेल. आम्ही अपयशालाही विसरून पुढे जाणे गरजेचे आहे. तुम्हाला चुकांमधून शिकावे लागेल,’’ असे पंडय़ाने सांगितले. पुढील ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२४ मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. आगामी दोन वर्षांच्या काळात भारतीय संघात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. विराट कोहलीसह रोहित शर्मासारख्या वरिष्ठ खेळाडूंना वगळलेही जाऊ शकते.
‘‘आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी अजून दोन वर्षांचा कालावधी आहे. आम्हाला नवीन खेळाडूंना पाहण्याची संधी मिळेल. मोठय़ा प्रमाणात क्रिकेट खेळले जाईल आणि अनेक खेळाडूंना संधी मिळेल. त्यासाठी तयारी आतापासून सुरू झाली आहे. आमच्याकडे पुरेसा वेळ आहे, त्यामुळे आम्ही यावर विचार करू. खेळाडूंनी खेळाचा आनंद घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे,’’ असे पंडय़ाने सांगितले. न्यूझीलंडच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामने खेळले जाणार आहेत. मालिकेत विराट, रोहित, केएल राहुल, दिनेश कार्तिक आणि रविचंद्रन अश्विन यांना कार्यभार व्यवस्थापनाअंतर्गत विश्राम देण्यात आला आहे. त्यांच्या अनुपस्थितीत शुभमन गिल, उमरान मलिक, इशान किशन आणि संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.
वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीबाबत पंडय़ा म्हणाला की,‘‘ वरिष्ठ खेळाडू नसले, तरीही ज्यांची निवड करण्यात आली आहे ते जवळपास दोन वर्षे खेळत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. काही जणांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे, कारण चांगले खेळल्यास ते आपली दावेदारी आणखी भक्कम करू शकतात.’’