कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानावर खेळवल्या गेलेल्या अखेरच्या वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ६ धावांनी मात करुन, २-१ या फरकाने मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारताने न्यूझीलंडलाही घरच्या मैदानावर पुन्हा एकदा पराभवाचं पाणी पाजलं. कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मांनी शतकी खेळी करुन भारताला ३३७ धावांपर्यंत मजल मारुन दिली.

भारताने दिलेल्या ३३८ धावांचा पाठलाग करताना कॉलिन मुनरो आणि कर्णधार केन विलियमसनने न्यूझीलंडला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर न्यूझीलंडचा संघ संकटात सापडला. यावेळी पहिल्या सामन्यातील शतकवीर टॉम लॅथमने रॉस टेलर आणि हेन्री निकोलस या खेळाडूंसोबत छोट्या भागीदाऱ्या रचून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांच्या कामगिरीमुळे न्यूझीलंडला ६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

दरम्यान या सामन्यात भारतीय खेळाडूंनी तब्बल १७ विक्रमांची नोंद केली.

१ – या वर्षात २ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला आहे.

१- कर्णधार म्हणून विराट कोहलीने सर्वात जलद ५ हजार धावांचा टप्पाही ओलांडला. ९३ डावांमध्ये विराटने ही कामगिरी केली आहे.

१- वन-डे सामन्यांमध्ये सर्वात कमी डावात ९ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा पहिला खेळाडू ठरलाय. विराटने दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हीलियर्सचा विक्रम मोडला. डिव्हीलियर्सने २०५ डावांमध्ये ९ हजार धावा काढल्या होत्या, तर विराट कोहलीने हा टप्पा केवळ १९४ धावांमध्ये पूर्ण केला आहे.

२ – एका वर्षात २ हजार पेक्षा जास्त धावा करण्याची विराट कोहलीची ही दुसरी वेळ ठरली.

२ – विराट कोहलीपाठोपाठ २०१७ या वर्षात १ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा रोहित शर्मा हा दुसरा खेळाडू ठरला.

२ – वन-डे क्रिकेट सामन्यात सर्वात जलद १५० षटकार ठोकणारा रोहित शर्मा दुसरा खेळाडू ठरलाय. १६५ डावांमध्ये रोहितने ही किमया साधली आहे.

२ – मार्टीन गप्टीलला बाद करत जसप्रीत बुमराहने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ५० वा बळी टिपला. केवळ २८ सामन्यांमध्ये बुमराहने ही कामगिरी केली आहे. अजित आगरकरनंतर सर्वात जलद ५० बळी घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. अजित आगरकरने आपल्या २३ व्या सामन्यात ५० वा बळी टिपला होता.

४ – विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीच्या नावावर वन-डे क्रिकेटमध्ये ४ द्विशतकी भागीदाऱ्या जमा आहेत.

५ – वन-डे क्रिकेटमध्ये १५० षटकार ठोकणारा रोहित शर्मा पाचवा भारतीय खेळाडू ठरला.

६ – एका कॅलेंडर वर्षात कर्णधार या नात्याने ६ शतकं झळकावणारा विराट कोहली पहिला कर्णधार ठरला आहे.

७ – विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सातवी द्विपक्षीय वन-डे मालिका जिंकली. सर्वात जास्त मालिका कर्णधार म्हणून जिंकण्याचा विक्रम आता कोहलीच्या नावावर जमा झालाय.

१० – भारताची सलामीची जोडी कालच्या सामन्यात ५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी करण्यासाठी १० वेळा अपयशी ठरली.

११- विराट कोहलीने आतापर्यंत २०० वन-डे सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आपल्या संघाचं सर्वाधीकवेळा प्रतिनिधीत्व करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहलीचा समावेश.

१२ – विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नावावर आतापर्यंत वन-डे क्रिकेटमध्ये १२ शतकी भागीदाऱ्या जमा आहेत.

१३ – कर्णधार या नात्याने विराट कोहलीचं कालच्या सामन्यात १३ वं अर्धशतक. सर्वाधीक अर्धशतकं झळकावणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराटला दुसरं स्थान.

१४ – घरच्या मैदानावरचं विराट कोहलीचं हे १४ वं शतक ठरलं. या यादीत सचिन तेंडुलकर विराट कोहलीच्या पुढे आहे, सचिनच्या नावावर घरच्या मैदानात २० शतकांची नोंद आहे.

१४६० – २०१७ या वर्षात विराट कोहलीने आतापर्यंत १४६० धावा काढल्या आहेत. एका वर्षात कर्णधार म्हणून सर्वाधीक धावा काढणाचा, ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटींगचा विक्रम विराटने मोडला. रिकी पाँटींगने २००७ साली १४२४ धावा काढल्या होत्या.

Story img Loader