आपल्या कारकिर्दीत अखेरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळणाऱ्या आशिष नेहराला भारतीय संघाने निवृत्तीचं गिफ्ट, सामना जिंकत दिलं. या विजयामुळे भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली. न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या गेल्या ६ टी-२० सामन्यांमधला हा भारताचा पहिलाच विजय ठरला. या सामन्यात अनेक क्षण भारतीय संघासाठी आठवणीचे ठरले. मात्र १५ व्या षटकात घडलेल्या एका घटनेमुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीही अचंबित झाला.
युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर टीम साऊदीने फाईन लेग पोजीशनच्या दिशेने चेंडू फ्लिक केला. सीमारेषेकडे जाणारा हा चेंडू, आपल्या कारकिर्दीचा अखेरचा सामना खेळणाऱ्या आशिष नेहराने एखाद्या कसलेल्या फुटबॉलपटूप्रमाणे फुटवर्क करत अडवला. आशिष नेहराच्या ह्या अनोख्या चपळाईला पाहून कर्णधार विराट कोहली आणि संपूर्ण संघानेही चांगलीच दाद दिली. फिरोजशहा कोटला मैदानावरील प्रेक्षकांनीही आशिष नेहराच्या या क्षेत्ररक्षणाला चांगलीच दाद दिली.
How's that for footy skills from our very own Nehraji? What do you make of that @YUVSTRONG12 😉 #INDvNZ pic.twitter.com/YaTeJk5d0t
— BCCI (@BCCI) November 1, 2017
१८ वर्ष भारतीय क्रिकेटच्या गोलंदाजीची धुरा सांभाळणाऱ्या आशिष नेहराने मागच्या महिन्यात आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यावेळी आपल्या घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळण्याची विनंती नेहराने बीसीसीआयला केली होती, याला मान देत बीसीसीआयच्या निवड समितीने पहिल्या टी-२० साठी आशिष नेहराची संघात निवड केली. काल झालेल्या सामन्यात आशिष नेहराला एकही बळी मिळाला नाही. त्याच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीने न्यूझीलंडच्या फलंदाजांचे झेल टाकले. मात्र सामन्यात अखेरचं षटक टाकल्यानंतर विराट कोहली आणि शिखर धवनला आपल्या खांद्यावर उचलत त्याला निरोप दिला.