३ सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडवर २-१ अशी मात केल्यानंतर भारताचा संघ आता टी-२० मालिकेसाठी तयार झाला आहे. या मालिकेतला पहिला सामना उद्या दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर खेळवण्यात येणार आहे. यावेळी गोलंदाजांना सतावणाऱ्या ‘ड्यू फॅक्टर’वर तोडगा काढण्यासाठी भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने नामी शक्कल शोधून काढली. आज कुलदीपने नेट्समध्ये ओल्या चेंडुने गोलंदाजीचा सराव केला. डावात दुसरी गोलंदाजी करण्याची वेळ आल्यास, चेंडुवरील पकड मजबुत राहण्यासाठी कुलदीपने ओल्या चेंडुने सराव केल्याचं समजतंय.
भारतात सध्या थंडीच्या दिवसांना सुरुवात होत आहे. त्यात दिल्ली आणि उत्तरेकडील राज्यात रात्रीच्या वेळी थंडीमुळे नेहमी दव पडतं. या दवामुळे डावात शेवटी फलंदाजी करणारा संघ कितीही मोठं लक्ष्य सहज पार करतो. अशा परिस्थितीत गोलंदाजांना बॉलवर पकड बसवणं कठीण जातं, ज्याचा फायदा फलंदाजांना मिळतो.
अवश्य वाचा – दिल्ली क्रिकेट असोसिएशनसाठी सेहवाग ‘एकमेव त्रिशतकवीर’, करुण नायरच्या त्रिशतकाचा विसर
भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी कुलदीप यादवला ही युक्ती दिली. यानंतर भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही काहीकाळ नेट्समध्ये ओल्या चेंडुने सराव केला. सध्या भुवनेश्वर कुमार हा गोलंदाजीत चांगल्या फॉर्मात आहे. अशावेळी न्यूझीलंडविरुद्ध टी-२० सामन्यात ही युक्ती कामाला येईल असा भारतीय संघ व्यवस्थापनाचा अंदाज आहे. कुलदीपने सरावादरम्यान नेट्समध्ये दिनेश कार्तिकला ओल्या चेंडुने काहीवेळ गोलंदाजी केली. यानंतर त्याने पीच क्युरेटरशी सामन्यादरम्यान पडणाऱ्या दवाबद्दलही विचारणा केल्याचं समजतंय. त्यामुळे कुलदीपची ही युक्ती सामन्यात किती फायदेशीर ठरतेय हे पहावं लागणार आहे.