New Zealand Vs England Test: वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने इंग्लंडचा पराभव केला. न्यूझीलंडने सुरुवातीला फलंदाजी करत २५८ धावा केल्या. पुढे इंग्लंडच्या संघाने हे लक्ष गाठण्याचा प्रयत्न केला. पण २५६ धावा करत इंग्लंडचा संपूर्ण संघ बाद झाला. या रोमांचक सामन्यामध्ये फक्त एका धावाच्या फरकामुळे न्यूझीलंडला विजय प्राप्त झाला. या विजयामुळे कसोटी मालिकेमध्ये न्यूझीलंडच्या संघाला १-१ अशी बरोबरी करणे शक्य झाले आहे. कसोटी मालिकेमधील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता.
या सामन्यामधला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंडच्या या सामन्यामध्ये एक तरुणी हातांमध्ये मोठा फलक घेऊन उभी होती. त्यावर “बेन, माझा प्रियकर क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आला आहे. आणि मी तुला पाहायला आले आहे”, असे लिहिलेले होते. खेळ सुरु असताना कॅमेरामॅनने त्या तरुणीच्या दिशेने कॅमेरा फिरवला आणि तेथील समालोचकांनी त्यावर गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या. दोन्ही संघामध्ये मिळून तीन बेन क्रिकेटचा सामना खेळत होते. त्यावरुन एक समालोचक “आता त्या तरुणीने उल्लेख केलेला बेन कोण? फोक्स, डकेट की… (बेन स्टोक्स)” असे म्हणाला.
त्यानंतर कॅमेरा बेन स्टोक्सकडे वळला. तेव्हा स्क्रीनकडे नजर टाकत त्याने मान हलवली. त्यावरुन लगेच “तरुणीने फलकावर उल्लेख केलेला बेन हा बेन स्टोक्स आहे” असे दुसऱ्या समालोचकाने म्हटले. पुढे एकाने “त्या तरुणीच्या प्रियकर/ बॉयफ्रेन्डच्या केसांवरुन ती नेमकं कोणत्या बेनला शोधत आहे हे ठरवता येईल” असे हसत म्हटले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी व्हिडीओमधील तरुणीचा बॉयफ्रेन्ड हा काहीसा जॉनी बेअरस्टोसारखा दिसत आहे अशा कमेंट्स केल्या आहेत.