पीटीआय, बंगळूरु

यशाच्या शिखरावर असणारा भारतीय संघ मायदेशातील आणखी एका मालिकेत संभाव्य विजेता म्हणून समोर येत असला, तरी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात संघातील युवा खेळाडूंबरोबर पावसाळी हवामानावरही नजरा खिळून राहणार आहेत. बंगळूरुमध्ये सध्या पाऊस भारतीय संघाच्या सातत्यासारखाच संततधार पडत आहे. खेळपट्टी आणि सभोवतालचे मैदान पूर्णपणे आच्छादित करण्यात आले आहे. संघाचा सरावदेखील होऊ शकला नाही. अशा वेळी दोन्ही संघ आपले अंतिम खेळाडू निवडण्याची घाई करणार नाहीत.

पाऊस आणि निकृष्ट दर्जाच्या सुविधांमुळे बांगलादेशविरुद्धची कानपूर कसोटी अडचणीत आली होती. पण, भारतीय फलंदाजांच्या वेगळ्याच पवित्र्यामुळे सामना उर्वरित दीड दिवसातही निकाल लागला होता. बंगळूरुमध्ये परिस्थिती फारशी वेगळी नाही. अर्थात, येथील सुविधा सर्वोत्तम दर्जाच्या आहेत हा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, दोन्ही संघाना मंगळवारी सराव करता आलेला नाही. त्यामुळे हा सातत्यपूर्ण पाऊस कसोटी सामन्याची मजा घालवू शकतो.

हेही वाचा >>>IND vs NZ India Playing 11: टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू होणार न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, कशी असणार भारताची प्लेईंग इलेव्हन?

भारताला फलंदाजीची चिंता नाही. रोहितने पत्रकार परिषदेत हेच स्पष्ट केले. त्यामुळे आता यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल या नवोदित फलंदाजांबरोबर कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या खेळाकडे चाहत्यांचा नजरा असतील. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी हे दोन्ही फलंदाज लयीत असणे भारताच्या दृष्टीने गरजेचे आहे. विराटला कारकीर्दीत नऊ हजार धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी ५३ धावांची गरज आहे. या उपलब्धीविषयी कमालीचे औत्सुक्य आहे.

न्यूझीलंडकडून कामगिरी उंचावणे अपेक्षित

न्यूझीलंड संघाला गोलंदाजी व फलंदाजी दोन्ही आघाड्यांवर अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशात त्यांना पहिल्या सामन्यात केन विल्यम्सनशिवाय खेळावे लागणार आहे. भारतात येण्यापूर्वी श्रीलंकेकडून झालेला पराभव त्यांच्या फिरकी गोलंदाजी खेळण्याच्या मर्यादा स्पष्ट करतो. त्यामुळे भारतात अश्विन व जडेजासारख्या गोलंदाजांचा सामना करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

● वेळ : सकाळी ९.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा.